कळंगुट येथील सिम्बा बारवर छापा

बार मालकास अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक


21st August 2017, 04:52 am
कळंगुट येथील सिम्बा बारवर छापा
प्रतिनिधी
गोवन वार्ता
म्हापसा : प्रभूवाडा, कळंगुट येथील सिम्बा बारवर अन्न आणि औषधे प्रशासन खाते व कळंगुट पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून बार बंद केला. तसेच बार मालकास अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली.
याबाबत अन्न व औषधे प्रशासन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या बारचे स्वयंपाक घर गलीच्छ स्थितीत असल्याची माहिती कळंगुट पोलिसांकडून प्रशासन खात्याला देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे
पोलिस निरीक्षक जिवबा दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांसह कळंगुट पोलिसांच्या सहाय्याने अन्न व औषधे प्रशासन खात्याचे वरिष्ठ अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रविवारी सायंकाळी बारची झडती घेतली. या झडतीमध्ये बारचे स्वयंपाक घर अस्वच्छ स्थितीत असल्याचे आढळून आले. स्वयंपाक घरात बनविण्यात येणारे पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचे स्पष्ट होताच अधिकाऱ्यांनी बार बंद करण्याची नोटीस बजावली व स्वयंपाक घर बंद केले.
या छाप्यावेळी बारमध्ये १.५ ग्रॅम गांजा सापडल्याने पोलिसांन बार मालक पीटर अवोन या नायजेरियनास अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली रात्री उशिरा अटक केली. पुढील तपास कळंगुट
पोलिस करीत आहेत.