राज्यात पाच ठिकाणी सामूहिक मधुमेह केंद्र सुरू करणार

विश्वजित राणे : चेजिंग डायबिटीज बेरोमीटर कार्यक्रमाचे आयोजन


21st September 2018, 06:24 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : चेजिंग डायबिटीज बेरोमीटर कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील मधुमेह रुग्णांची माहिती डिजीटलाईज केली जाणार आहे. त्यामुळे डॉक्टरकडे अशा रुग्णांचा तपशील उपलब्ध होणार आहे. तसेच राज्यात पाच ठिकाणी सामूहिक मधुमेह केंद्र सुरू करण्यात येणार अाहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
कला अकादमीत गुरुवारी चेजिंग डायबिटीज बेरोमीटर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डेनिस एंबसीचे राजदूत पीटर जेंसन, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन प्रदीप नाईक, अन्न व प्रशासन विभागाच्या संचालक ज्योती सरदेसाई, आरोग्य सचिव अशाेक कुमार, आरोग्य संचालक संजीव दळवी, महिला व बाल कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई, मॅलविन डिसोझा, डॉ. एडविन गोम्स, अंकुश देसाई उपस्थित होते.
गोव्यात मोठ्या प्रमाणात मधुमेह रुग्ण आढळत आहेत. त्याचे निदान लवकर होणे आवश्यक आहे. आतापर्यंत ३ हजार ५०० मधुमेह रुग्णांची माहिती संकलित करण्यात आली आहे, असे डॉ. एडविन गोम्स यांनी सांगितले.

मधुमेही उपचारासाठी चिकित्सकांना प्रशिक्षण देणार
सामूहिक मधुमेह केंद्र गोवा वैद्यकीय महाविद्यालय, उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, फोंडा, कॉटेज रुग्णालय, चिखली या ठिकाणी सुरू करण्यात येणार अाहेत. सध्या सरकारी रुग्णालयामध्ये मोफत इन्सुलिन उपलब्ध करण्यात आली असून या उपचारासाठी आवश्‍यक असणार्‍या अत्याधुनिक सुविधांबाबत चिकित्सकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे हे चिकित्सक घराघरांत जाऊन जागृती व मार्गदर्शन करणार आहेत, असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.                         

हेही वाचा