भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे २५ रोजी उद्घाटन

राज्यातील शंभर उच्च माध्यमिक विद्यालयांचा सहभाग


21st September 2018, 06:24 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतर्फे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे दोनापावला येथील संस्थेच्या ठिकाणी आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दि. २५ रोजी सकाळी ९ वा. करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे (एनआयओ) संचालक प्रा. सुनील कुमार सिंग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. लेविन्सन मार्टिन, शिक्षण सचिव नीला मोहनन, विज्ञान भारतीचे जयंतराव सहस्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत.
लखनौ येथे दि. ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यातील १०० उच्च माध्यमिक विद्यालयातील १२०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. महोत्सवात एनआयच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनाचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. यामध्ये सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे वापरले जाते हे पाहता येणार आहे, असे सुनील कुमार यांनी सांगितले.
यावेळी विविध विषयांवर व्याख्याने आणि माहिती प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यामध्ये समुद्र, समुद्र जीवन, मरीन रोबोट, सागरी प्रदूषण आणि हवामान बदल आणि सागरी सर्व्हे संबंधी माहिती दिली जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या शोधाची सीए सीआरटीसाठी निवड झाली आहे त्यांच्या शोधाचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ६ प्रकल्प सादर केले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.