पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन

खोलावासीयांचा पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा


21st September 2018, 06:19 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : काणकोण तालुक्यातील खोला पंचायत क्षेत्रात येत्या पंधरा दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत केला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खोला भागातील नागरिकांनी पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा नेऊन काणकोण पाणी पुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंते लेस्टर डिसोझा यांची कार्यालयात भेट घेऊन दिला. यावेळी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर येत्या पंधरा दिवसांत या प्रकरणी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक अभियंते डिसोझा यांनी दिले.
यावेळी श्रीनिवास नायक, सुनील पागी, प्रशांत खोलकर, पंच अजय पागी, माजी पंच संतोष पागी, जयप्रकाश वेळीप, शुभम पागी, गौरांग कामत व अन्य नागरिक उपस्थित होते.
शेळप पाणी पुरवठा प्रकल्पात चार पंप कार्यरत असून त्यातील एक पंप नादुरुस्त असल्याने पाणी पुरवठ्यात अडथळे येत असल्याचे सहाय्यक अभियंत्याने यावेळी सांगितले. मात्र, तक्रार दिल्यानंतरही पाणी पुरवठा नियमित होत नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला. साळेरी प्रभागात नेहमीच अनियमित पाणी पुरवठा होत असून त्याबद्दल विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळतात. अशा कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी करण्यात आली.
साळेरी, काजूमळ, कामरमाळे, शिरोटी, माटवेमळ तसेच अन्य भागांतील पाणी टंचाईच्या संदर्भात पाच महिन्यांपूर्वी खोला ग्रामसभेत चर्चा करण्यात आली होती. मात्र, ऐन पावसाळ्यातही पाणी व्यवस्थेत कोणताच बदल झाला नाही. ग्रामस्थांना तीन-तीन दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली तर खंडित वीज पुरवठा, सामानाची कमतरता, नादुरुस्त पंप व मासिक वेतन अशी कारणे त्यांच्याकडून देण्यात येतात, अशी तक्रार नागरिकांनी लेस्टर डिसोझा यांच्याकडे यावेळी केली.

कर्मचाऱ्यांमुळे अनियमित पाणी पुरवठा
खोला पंचायत क्षेत्रात शेळप पाणी प्रकल्प व पारयेकट्टा कुपनलिका प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. त्यातील शेळप पाणी पुरवठा प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणी असूनही काही कर्मचाऱ्यांच्या मनमानी व हेकेखोर वृत्तीमुळे पाणी पुरवठा अनियमित होत आहे. अन्य कर्मचारी तसेच नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणाहून अन्यत्र बदली केल्यास पाणी पुरवठ्यात नियमितपणा येईल, असा दावा नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सहाय्यक अभियंत्यासमोर केला.