काँग्रेसने सत्ता स्थापन करून दाखवावीच : राणे

21st September 2018, 06:11 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : राज्यात भाजप आघाडीचेच सरकार राहणार आहे. सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसतानाही काँग्रेस सत्तेची स्वप्ने पाहत आहे. हिंमत असेल, तर काँग्रेसने राज्यपालांकडे २१ आमदार घेऊन जावे आणि राज्यात सत्ता स्थापन करून दाखवावी, असे आव्हान आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गुरुवारी केले. पणजीत आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

सद्यस्थितीत भाजपकडे बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेसने काहीही केले, तरी त्यांना सरकार घडविता येणार नाही. आमचे नेते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच राहणार असल्याने नेतृत्व बदलण्याचा विषयच येत नाहीत. शिवाय घटक पक्षही आमच्यासोबतच असल्याने विरोधकांकडून सध्या सुरू असलेली नेतृत्व बदलाची चर्चा बिनबुडाची आहे, अशी टीका राणे यांनी केली. राज्यात नुकत्याच येऊन गेलेल्या भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांनीही नेतृत्व बदलण्याचा विषय काढला नाही. कारण मुख्यमंत्री राज्यात उपलब्ध नसतानाही सरकारचा कारभार सुरळीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सध्या मुख्यमंत्री पर्रीकर ई-मेल तसेच अन्य मार्गांनी राज्य कारभारावर लक्ष ठेवून आहेत. पण विरोधकांकडून विनाकारण प्रशासन कोलमडल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

सोमवारी दिल्लीला : राणे

नेतृत्व बदलाचा विषय असेल, तर भाजपची केंद्रीय समिती, राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष त्याबाबत निर्णय घेतील. यासाठी घटक पक्षांचे मतही विचारात घेतले जाईल. आपण सोमवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची विचारपूस करण्यासाठी दिल्लीला जाणार आहे, असेही विश्वजीत राणे यांनी नमूद केले.

भाजपसोबतच राहणार!

कॉँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी केंद्रातून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आणल्याचे आपण गुरुवारी वर्तमानपत्रांत वाचले. पण कॉँग्रेसकडे सत्ता स्थापन करण्याएवढे संख्याबळ असते, तर त्यांना भाजप आमदारांना फोन करण्याची गरज भासली नसती. आम्ही भाजपात पक्ष सोडण्यासाठी आलेलो नाही. यापुढेही आपण भाजपसोबतच राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.