मगोच्या पाठिंब्यासाठी काँग्रेसकडून फिल्डिंग

बहुमताचे गणित जुळविण्यासाठी धडपड सुरू


21st September 2018, 06:10 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : मगोचे ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्या भाजप तसेच सरकारमधील अन्य आघाडी घटकांकडून झालेल्या अवहेलनेचा लाभ उठविण्याचे काँग्रेसने ठरविले असून, मगो पक्षाचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘फिल्डिंग’ही लावली आहे. पक्षाचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांच्याकडून त्यासंबंधीची चाचपणी सुरू आहे.

राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडून पुढील दोन दिवसांत विशेष विधानसभा अधिवेशन बोलाविण्यासंबंधी सादर केलेल्या प्रस्तावावर प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याने बहुमताचे गणित जुळविण्यासाठी काँग्रेसने धडपड सुरू केली आहे. मगोचा पाठिंबा मिळाल्यास अन्य अपक्षांच्या मदतीने बहुमतासाठीचा २१ हा जादुई आकडा पार करू, असा विश्वास वाटत असल्याने काँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बुधवारी काँग्रेस श्रेष्ठींचा संदेश घेऊन राज्यात दाखल झालेल्या चेल्लाकुमार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

माजी मुख्यमंत्री तथा पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे यांचे सुदिन ढवळीकर यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे मगोचा पाठिंबा मिळविण्याची जबाबदारी राणे यांच्याकडे देण्याचे ठरले आहे. मुख्यमंत्रिपदी प्रतापसिंग राणे यांची वर्णी लावून उपमुख्यमंत्रिपद सुदिन ढवळीकर यांच्याकडे देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त मगोच्या अन्य दोन आमदारांना मंत्रिपदे देण्याचा निर्णयही झाला असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या प्रस्तावाला काँग्रेस विधीमंडळ गटाचा पाठिंबा मिळविण्यासाठी डॉ. चेल्लाकुमार प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत गोवा फॉरवर्ड पक्षासोबत जाऊ नये, याबाबत पक्षात एकमत झाल्याचेही खास सूत्रांकडून सांगण्यात आले. मगोला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा हा ‘प्लान’ यशस्वी ठरल्यास त्याचा लोकसभा निवडणुकीतही लाभ होईल. पण गोवा फॉरवर्डसोबत तडजोड केल्यास त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसेल, अशी धास्ती काँग्रेसच्या अनेक नेत्यांना वाटत आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्री म्हणून तात्पुरता ताबा सुदिन ढवळीकर यांच्याकडे देण्याचे ठरविले होते. पण या प्रस्तावाला भाजपमधीलच एका गटाकडून आक्षेप घेण्यात आला. गोवा फॉरवर्डची ढाल पुढे करून सुदिन ढवळीकर यांना या पदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न भाजपमधीलच एका गटाने केल्याची माहिती मगोला मिळाल्याने ढवळीकरबंधू नाराज झाले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिल्यास मगोचा पाठिंबा मिळू शकेल, या अनुषंगाने हे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव तसेच भाजप आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या इतर दोन आमदारांचाही पाठिंबा मिळेल, असा विश्वास काँग्रेसला आहे. त्यामुळेच मगोची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत.

मॉन्सेरात, रॉड्रिगीस यांचा दौरा पूर्वनियोजित

राज्यात राजकीय पेचप्रसंग सुरू असताना काँग्रेसच्या आमदार जेनिफर मॉन्सेरात आणि फिलिप नेरी रॉड्रिगीस हे विदेश दौऱ्यावर गेले आहेत. या विषयावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यासंबंधी स्पष्टीकरण देताना हा दौरा पूर्वनियोजित होता आणि त्याबाबत या आमदारांनी आपल्याला कल्पना दिल्याचे सांगितले. गरज पडली तर तत्काळ हजेरी लावण्याची तयारी या दोन्ही नेत्यांनी दर्शविली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसकडून आज खाण पीडितांची भेट

खाण उद्योग पूर्ववत होण्याची आशा बाळगून असलेल्या खाण पीडितांची घोर निराशा झाली आहे. भाजपकडून केंद्रीय पातळीवर कोणताच निर्णय घेतला जात नसल्याने खाण पीडितांनी आक्रमक पवित्रा घेण्याचा विचार सुरू केला आहे. या अनुषंगाने विविध भागांतील खाण पीडितांची शुक्रवारी काँग्रेसचे नेते भेट घेणार आहेत. डॉ. चेल्लाकुमार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व अन्य आमदार यावेळी हजर राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.