अतिरिक्त खाते वाटपाचीही चर्चा


21st September 2018, 06:10 pm

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : तूर्तास आहे तीच व्यवस्था पुढे नेत फक्त खाते बदल करून जे मंत्री सक्रिय आहेत, त्यांच्याकडे अतिरिक्त खाती देण्याचा प्रस्ताव भाजपने विचारात घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला, तरच पुढील प्रक्रिया होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे तत्काळ अर्थ, तर नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे गृह खाते येऊ शकते.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह वीजमंत्री पांडुरंग मडकईकर व नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडील खात्यांचे वितरण उर्वरित नऊ मंत्र्यांमध्ये होणार आहे. मुख्यमंत्र्यांनीच या खात्यांचे वाटप करावे, यासाठीचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींनी पर्रीकरांशी चर्चेला घेण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मान्य केला, तर त्यांच्याकडून राज्यपालांना यादी जाईल. त्यानंतर त्याबाबतची अधिकृत घोषणा होईल.

भाजपकडे वीज, शिक्षण, वन, खाण ही खाती राहतील, तर मगो, अपक्ष व गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांकडे सहकार, नागरी उड्डाण, समाज कल्याण, नगर विकास, कायदा, दक्षता ही खाती जाण्याची शक्यता आहे. राजभवनच्या सूत्रांनी खाते वाटपाविषयी अद्याप काहीच सूचना मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या नाहीत, असे स्पष्ट केले. सचिवालयातील सूत्रांनीही अधिकृतपणे अजून खाते वाटपाची यादी आलेली नाही, असे सांगितले. काही मंत्र्यांनी आपल्याला कल्पना आहे, पण कोणती खाती कोणाला दिली आहेत, त्याची माहिती उपलब्ध नाही असे सांगितले.

शुक्रवारपर्यंत चित्र स्पष्ट

- गोवा फॉरवर्ड, मगो व भाजपमध्ये समान पद्धतीने महत्त्वाची खाती विभागून देण्याविषयी पक्षश्रेष्ठींनी सूचविले आहे. मुख्यमंत्र्यांकडून याविषयी यादी आल्यानंतरच पुढील तपशील स्पष्ट होणार आहे.

- राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना मंत्र्यांना अतिरिक्त खाती दिली जातील का असे विचारले असता, आम्ही सर्व माहिती भाजपाध्यक्ष अमित शहा यांना दिली आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतात ते शुक्रवारपर्यंत कळेल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा