राजकीय निर्णय आज किंवा उद्या

भाजपाध्यक्ष अमित शहा घेणार निर्णय; विनय तेंडुलकर, सावईकर गोव्यात परत

21st September 2018, 06:09 Hrs

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : गोव्यातील राजकीय स्थितीबाबत उपाय शोधण्यासाठी गेल्या रविवारपासून सुरू झालेली चाचपणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नेतृत्व बदल, मंत्र्यांची एखादी नियंत्रण समिती किंवा अतिरिक्त खात्यांचे वाटप अशा वेगवेगळ्या पर्यायांबाबत पक्षश्रेष्ठी अमित शहांनी गोव्यातील नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत पक्षश्रेष्ठी आपला निर्णय जाहीर करतील.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी आम्ही त्यांना राज्यातील राजकीय स्थितीची कल्पना दिली आहे. निरीक्षकांनी आपला अहवालही दिला आहे. त्यामुळे शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत गोव्यातील राजकीय स्थितीबाबत पक्षश्रेष्ठींकडून तोडगा जाहीर होईल, असे राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी गुरुवारी सांगितले. पण कोणतेही राजकीय बदल एवढ्यात होणार नाहीत. त्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असे दिल्लीतून गुरुवारी गोव्यात परतल्यानंतर दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर म्हणाले.

आयुष मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि खासदार नरेंद्र सावईकर यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतली. गोव्यात येऊन गेलेले भाजपाचे निरीक्षक रामलाल, बी. एल. संतोष व विजय पुराणिक हेही या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील एकूणच राजकीय स्थितीबाबत शहा यांनी सर्व नेत्यांकडून माहिती मिळविली. येथे कुठले राजकीय बदल करता येतील, त्याबाबतच्या पर्यायांवरही चर्चा झाली. नेतृत्व बदल केल्यास कोणत्या नेत्यास आघाडीचे नेते स्वीकारतील तसेच सध्या पर्रीकर यांनाच मुख्यमंत्रिपदी ठेवून आणि इतर मंत्र्यांना खाती वाटप करून कशा पद्धतीने प्रशासन मार्गी लावता येईल, यावरही चर्चा झाली. पर्रीकरांच्या अनुपस्थितीत एखादी नियंत्रण समितीही स्थापन करण्याचा पर्याय आहे. मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र जायला हवे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करून शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत एखादा निर्णय जाहीर होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी काही मंत्र्यांशी संपर्क साधून होणाऱ्या राजकीय बदलांची कल्पना दिली आहे. मात्र अधिकृत घोषणा शुक्रवार किंवा शनिवारी अपेक्षित आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आमच्याकडून संपूर्ण माहिती घेतली आहे. बुधवारी त्यांच्याशी बराचवेळ चर्चा झाली आहे. त्यांचा निर्णय आम्हाला शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत अपेक्षित आहे.

- विनय तेंडुलकर, राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष

Related news

‘फोमेंतो मीडिया’तर्फे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

मिरामार येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पाकला अद्दल घडविण्याची मागणी Read more

विष्णू वाघ यांच्यावर आज फोंड्यात अंत्यसंस्कार

बांदोडकर मैदानावर अंत्यदर्शन; मंत्री गोविंद गावडे यांची माहिती Read more