मनाच्या कोपऱ्यातून जात नसलेली जात

माळरानावरती भटकून घरात आलेली कुत्री, मांजरे आम्हाला चालतात. ख्रिस्ती, मुस्लिम धर्मियांना घरात प्रवेश आहे. परंतु आमच्या गावात पिढयानपिढया राहणाऱ्या समाजातल्या घटकांना घराचा उंबरठा ओलांडून ओसरीवर सुद्धा सहसा येऊ दिले जात नसे, त्यामुळे पोटलीचा स्पर्श टाळून वरून टाकले जाणारे जेवणाचे पान त्यांच्या वाट्याला यायचे.

Story: लढवय्या | राजेंद्र केरकर |
21st September 2018, 06:00 am


आज ही त्या दिवसांची आठवण झाली की अस्वस्थ होऊ लागतो. दरवर्षी गणेशोत्सवाच्या दिवसांत त्या बायकापोरी माथ्यावरती टोपल्या घेऊन घरोघरी दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या पानांना एकत्र करण्यासाठी यायच्या. आर्थिक परिस्थिती जेमतेम आणि शेती-बागायती करण्याची परंपरा जेमतेम असल्याने गावातून बांबू विकत घेऊन त्या टोपल्या, सुपे, चटया आणि शेतीसाठी लागणारी आयदाने विणायची. त्याच्या बदल्यात त्यांना त्याकाळी रोख पैसे देण्याऐवजी भाताचे दाणेगोटे दिले जायचे. मुख्य गावात धारेपासून बाहेर त्यांची लोकवस्ती असल्याने त्यांच्या सुखदु:खाची कल्पना सण उत्सवाच्या प्रसंगी नेसलेल्या सामान्य कपड्यांवरून यायची. शिक्षण, सरकारी नोकरी, उद्योग धंदे, नागरी सुविधा त्यांना अपवादात्मक पुरवल्या जात असल्याने अज्ञान, दारिद्र्य, निरक्षरता यांच्याशी संघर्ष करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना जीवन जगावे लागे. माणसासारखे माणूस असताना त्यांच्या वाट्याला पशूपेक्षा कमी दर्जाचे जीवन वाट्याला आल्याने मला वाईट वाटायचे. प्रचलित असंख्य लोककथांतून आमच्या परिसरात असलेल्या अस्पृश्यतेच्या, जातीयतेच्या भीषणतेची कल्पना यायची.
कालांतराने मी जेव्हा महात्मा गांधीजी, साने गुरुजी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे वाचन केले तेव्हा त्यातल्या मानवी मुल्यांनी माझ्या जगण्याला दिशा आणि प्रेरणा देण्यात महत्त्वाचे योगदान केले. गणेश चतुर्थीच्या दिवसांत सुशिक्षित, साक्षर झालेल्या नव्या मुलींनी जेवणाची पाने घरोघरी येऊन टोपल्या गोळा करणे टाळले. परंतु जुन्या पिढीतल्या महिला मात्र सण उत्सवप्रसंगी मिळणारे जेवण आणि त्यातले जिन्नस गोळा करण्यास बरीच वर्षे यायच्या. आमच्या गावात प्रचलित असलेली ही प्रथा नाहीशी व्हावी अशी माझी धारणा होती. त्यामुळे माझ्या आईच्या मनात ठाम असलेली जातीयता, अस्पृश्यतेची भावना दूर व्हावी म्हणून मी केलेल्या प्रयत्नांना हळुहळू यश येऊ लागले. माळरानावरती भटकून घरात आलेली कुत्री, मांजरे आम्हाला चालतात. ख्रिस्ती, मुस्लिम धर्मियांना घरात प्रवेश आहे. परंतु आमच्या गावात पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या समाजातल्या घटकांना घराचा उंबरठा ओलांडून ओसरीवरसुद्धा सहसा येऊ दिले जात नसे, त्यामुळे पोटलीचा स्पर्श टाळून वरून टाकले जाणारे जेवणाचे पान त्यांच्या वाट्याला यायचे. यदाकदाचित त्यांना जर पिण्याचे पाणी हवे तर ते सरळपणे करवंटीत ओतून दिले जायचे. त्यामुळे ही अनिष्ट प्रथा बंद व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा होती आणि त्यासाठी सण उत्सव प्रसंगी जेवणाची पाने नेण्यासाठी टोपल्या माथी घेऊन येणाऱ्या बायांना घरात बोलावून जेव्हा जेवण वाढले, तेव्हा ते जेवण्यास त्यांना परिश्रमाने मला राजी करावे लागले. घरात उंबरठा ओलांडून आत प्रवेश करण्यास त्यांना प्रवृत्त व्हावे म्हणून मी केलेले प्रयत्न सफल झाले. गावात पहिल्यांदाच घरात प्रवेश करून जेवताना त्या वयस्क बायांच्या नयनी अश्रू गोळा झाले होते. आम्ही पायरीवर बसून दुसऱ्यांच्या घरी गेल्या कित्येक वर्षांपासून जेवणात धन्यता मानलेली आहे आणि त्यामुळे घरात येऊन जेवण्यासारखे कृत्य त्यांना परंपरेची प्रतारणा करण्यासारखे वाटायचे. परंतु घरात प्रवेश देऊन, सन्मानाने त्यांना जेवण देण्याच्या माझ्या कृत्याची वार्ता गावात पसरायला विलंब लागला नाही.
अस्पृश्यता हा आमच्या समाजाला लागलेला कलंक असून आजच्या काळात ही या अनिष्ट प्रथेचे पालन आणि समर्थन समाजात मोठ्या प्रमाणात होत आहे ही चिंताजनक आणि अमानवीय बाब आहे हा विचार सातत्याने सांगून सुद्धा या परिस्थितीत विशेष असा बदल ग्रामीण भागात झालेला नाही. त्यामुळे आज ही अन्य जातीतले लोक त्यांना आपल्या घरात प्रवेश द्यायला टाळतात. शासकीय योजनेच्या अंतर्गत आज स्वतंत्र विहीर आणि पाणी पुरवठा नळाद्वारे केल्याने त्यांच्या वाट्याला पूर्वीचे त्रास आणि अवहेलना काही प्रमाणात कमी झालेली आहे. परंतु जेथे नळ योजना पोहचलेली नाही आणि स्वतंत्र विहिरीची व्यवस्था नाही, तेथे कळशीभर पाण्यासाठी उन्हाळ्यात आणि आणीबाणीच्या प्रसंगी वणवण सोसावी लागत आहे. ज्या गावात पिढ्यान पिढ्या वास्तव्य आहे तेथील अन्य समाज बांधवांसमवेत सण उत्सवाच्या प्रसंगी सहभागी होण्याची संधी आजही दिली जात नाही. अस्पृश्यता ही अमानवीच प्रथा असूनही आज ती पाळली जाते. खाजगी घरात जसा सहसा प्रवेश नाही तसेच संपूर्ण गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाशी निगडित असलेल्या मंदिरातही त्यांना प्रवेश देणे टाळले जाते. आज जातीयतेच्या कटु जहरापायी संत्रस्त झालेल्या नव्या पिढीने बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्यात प्रवेश केलेला असला तरी त्यांच्याकडे पहाण्याची आणि व्यवहार करण्याच्या एकंदर मानसिकतेत बदल झालेला नाही. शिक्षण, बुद्धिमत्ता आणि प्रतिभेच्या पाठबळावर सरकार दरबारी प्रतिष्ठेच्या जागेवर नियुक्ती झालेली असताना, मंदिराच्या सभामंडपातही गावात प्रवेश देण्यास मज्जाव केला जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती कोणत्या मार्गाने बदलणे शक्य आहे याचे बरेच ठोस पर्यायही असफल ठरत आहे.
आपल्या वाड्यावरची नवी सुशिक्षित पिढी बौद्ध धर्मीय झालेले असले तरी जुन्या पिढीने पारंपरिक श्रद्धा, समजुती, रीतिरिवाजांना फाटा न देता त्यांचे पालन करण्याला प्राधान्य दिलेले आहे. लोकशाही संकेतांमुळे आज दलित समाजात ही गणेश चतुर्थीचा उत्सव उत्साहात साजरा केला जात असून त्यांच्याकडे प्रागतिक विचारांचे पालन करणारी नवी मोजकीच मंडळी ये-जा करतात. त्यामुळे अशावेळी गणेश विसर्जनाची सुविधा सरकारी खर्चाने गावात उपलब्ध करून दिलेली असताना, दलित समाज अशा सार्वजनिक स्थळांचा उपयोग करण्यास पुढे सरसावत नाही. काही अपवाद सोडला तर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी मृताला जागा मिळणे दुरापास्त होत असते. समाजाची ही मानसिकता दूर व्हावी, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावे म्हणून गेल्या तीन दशकांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. परंतु असे असताना अजून ही बराच लांबचा टप्पा गाठायचा आहे. आमच्या घरात दलित समाजातल्या घटकांना खाऊ-जेऊ घालण्याच्या प्रकाराची निर्भत्सना झालेली असताना आणि त्याबाबत टोमणे ऐकण्याची पाळी आलेली असताना माझ्या कुटुंबातल्या सदस्यांच्या पाठबळावरती या प्रथेविरुद्ध लढण्याचे बळ मला लाभलेले आहे. आम्ही माणूस म्हणून वावरत असताना समाजातल्या दलितांना माणुसकीच्या भावनेने वागणूक देणे महत्त्वाचे आहे ही भावना जेव्हा आमच्या परिसरात वाढीस लागेल तेव्हाच अस्पृश्यतेचा कलंक समाजातून लोप पावेल.