बार्देश, डिचोलीला अशुद्ध पाणी पुरवठा!

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील मिक्सर, स्टरर नादुरुस्त

20th September 2018, 07:00 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता

म्हापसा : अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी पूल, मिक्सर आणि स्टरर गेल्या काही वर्षांपासून नादुरुस्त स्थितीत आहेत. त्यामुळे बार्देश तसेच डिचोली तालुक्यातील विविध भागांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील बिघाडामुळे बार्देश व डिचोली तालुक्यातील काही भागांत निर्माण झालेल्या पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर, तेथील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रकल्पातील विविध प्रकार सध्या उघड होत आहेत. ९२ एमएलडी क्षमतेच्या या जलशुद्धीकरण प्रकल्पात पार नदीतील पाणी खेचल्यानंतर ते शुद्ध करण्यासाठी तिन्ही प्रकल्पांत मिक्सर व स्टरर पंप बसविण्यात आलेले आहेत. पण हे पंप गेले अनेक वर्षांपासून नादुरुस्त स्थितीत आहेत. पंप दुरुस्तीसाठी सोयीस्कर व्हावेत तसेच पाण्यात निर्माण झालेला शेवाळ साफ करायला मिळावा, यासाठी प्रकल्पातील पाण्यात जे लोखंडी पूल उभारण्यात आलेले आहेत, तेही मोडकळीस आले आहेत. या पुलांवर तसेच पाण्याखाली शेवाळ पसरले आहे. त्यामुळे पाण्यात उतरून आतील गाळ काढणारे शरल आणि मिक्सर दुरुस्त करण्यास कंत्राटदार कंपनीने नकार दिला आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मोडलेल्या पुलाची दुरुस्ती केल्यानंतरच मिक्सर व स्टरर  दुरुस्तीचे काम हाती घेणे शक्य होईल, असे म्हणत कंत्राटदार कंपनीने कामगारांचा जीव धोक्यात घालण्यास स्पष्ट नकार दर्शविल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.

नदीतील पाणी खेचल्यानंतर ते शुद्ध न करताच त्याचा लोकांना पुरवठा करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पातील मिक्सर व शरल दुरुस्त करण्यासाठी अडथळा ठरत असलेल्या प्रकल्पातील पुलाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे बार्देश व डिचोली तालुक्यातील नागरिकांना नळाद्वारे येणारे गढुळ पाणी प्यावे लागत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रमुख अधिकाऱ्यांची कमतरता, कनिष्ठ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, कंत्राटदार कंपनीचे थकित बिल तसेच अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा या कारणांमुळे प्रकल्पातील पंपांत वारंवार बिघाड होण्याचे तसेच नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे प्रकल्पातील अधिकाऱ्यांची वेळीच कानउघाडणी करण्याची किंवा त्यांची इतरत्र बदली करण्याची गरज आहे, अशी मागणी होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टाकी कोसळण्याच्या स्थितीत

प्रकल्पातील ३० एमएलडी प्लांटमधून फिल्टर पाणी एका टाकीमध्ये सोडले जाते. त्यानंतर त्या पाण्याचा म्हापसा तसेच इतर भागांना पुरवठा करण्यात येतो. पण फिल्टर पाणी ज्या टाकीत जाते, ती टाकी जीर्ण झाली असून, तिचे लोखंडही गंजून गेले आहे. पूर्णपणे मोडकळीस आलेली ही टाकी कोसळल्यास बार्देश तालुक्यात गंभीर पाणी समस्या निर्माण होण्याची तसेच तेथील कामगारांच्याही जिवाला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related news

‘फोमेंतो मीडिया’तर्फे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

मिरामार येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पाकला अद्दल घडविण्याची मागणी Read more

विष्णू वाघ यांच्यावर आज फोंड्यात अंत्यसंस्कार

बांदोडकर मैदानावर अंत्यदर्शन; मंत्री गोविंद गावडे यांची माहिती Read more