नेतृत्व बदलाचा विषयच नगण्य : सुदिन


20th September 2018, 07:00 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे इस्पितळात उपचार घेत असले, तरी ते प्रशासनावर देखरेख ठेवून आहेत. महत्त्वाच्या फाईल्स त्यांच्याकडून हातावेगळ्या केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत नेतृत्व बदलाचा विषय नगण्य आहे, अशी प्रतिक्रिया मगोचे ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी व्यक्त केली.

मुख्यमंत्री बरे होऊन राज्यात परत येईपर्यंत पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते. परंतु भाजपसह आघाडीचे काही घटक नेतृत्व बदलासाठी इतके उतावीळ का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मगो पक्ष एकसंध आहे. पक्षाचे तिन्हीही आमदार एकत्रित आहेत. त्यामुळे मगो पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न अजिबात यशस्वी होणार नाही, असा ठाम विश्वासही ढवळीकर यांनी व्यक्त केला.

बॉक्स

तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद जयललिता यांच्याकडे होते. त्या देखील सहा महिने इस्पितळात होत्या. पण तामिळनाडूसारख्या मोठ्या राज्यात कधीच नेतृत्व बदलाचा विषय उपस्थित झाला नाही. गोव्यात नेतृत्व बदलाचा विषय चर्चेला येणे हे राजकीय नितीधर्म पायदळी तुडवले जात असल्याचेच द्योतक आहे, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.