विजय हजारे चषक : महाराष्ट्रची गोव्यावर ५ गड्यांनी मात


19th September 2018, 05:35 pm

अलुर : बुधवारपासून सुरू झालेल्या विजय हजारे चषकाच्या पहिल्याच सामन्यात गोव्याच्या संघाला महाराष्ट्रकडून ५ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. गोव्याने महाराष्ट्रला २६७ धावांचे लक्ष्य दिले होते हे लक्ष्य महाराष्ट्राने ४७.४ षटकांत गाठले.
सगुण कामतच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या गोव्याने कर्णधार अमोघ देसाईच्या (६५) अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्रसमोर आव्हानात्मक धावसंख्या ठेवली होती परंतु गोव्याच्या गोलंदाजांना विशेष काही करता आले नाही व सामना महाराष्ट्रने आपल्या नावावर केला. या विजयामुळे ‘ए’ गटात महाराष्ट्राला ४ गुण मिळाले तर गोव्याचे खाते उघडणे अजून बाकी आहे. याच गटातील इतर सामन्यांमध्ये मुंबई व पंजाबने विजय मिळवला तर हिमाचल व बरोडाला पराभवाचा सामना करावा लागला.
नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोव्याच्या डावाची सुरुवात सुमीरन आमोणकर व कर्णधार अमोघ देसाईने केली. गोव्याला पहिल्या सामन्यात चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती मात्र सुमीरन आमोणकर (०) स्वस्तात तंबूत परतला. यानंतर अमोघने स्नेहल कवठणकरसोबत (२६) गोव्याचा डाव पुढे नेला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. संघाची धगावसंख्या ७४ असताना स्नेहल बाद झाला.
स्नेहल बाद झाल्यानंतर आलेल्या अमित वर्मानेही (३८) चांगली फलंदाजी करत आपल्या कर्णधाराला चांगली साथ केली. गोव्यासाठी ​तिसरा धक्का अमोघ देसाईच्या रुपात बसला. अमोघने आपल्या खेळीत ९३ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार लगावले. गोव्याने तिसरा गडी १४५ धावांवर गमावला.
गोव्याच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी लहान लहान भागीदाऱ्या करून गोव्याला २६६ धावांपर्यंत नेण्यात ये मिळवले. सुयश प्रभुदेसाई (३५), किनन वाझ (३८) व दीपराज गावकर (३४) यांनी महत्त्वाची खेळी करत गोव्याला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. महाराष्ट्रतर्फे समद फल्लाहने २ तर अनुपम सांखलेचा, सत्यजीत बच्चाव, शमशुजामा काझी व कर्णधार राहुल त्रिपाठी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या महाराष्ट्रने डावाला आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (६७) अर्धशतकी तर जय पांडेने (११७) नाबाद शतक लगावत आपल्या संघाला विजय ​मिळवून दिला. गोव्यातर्फे अमोघ देसाईने २ तर लक्ष्य गर्ग, कृष्णा दास व अमित वर्मा यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला. गोव्याचा पुढचा सामना २१ सप्टेंबर रोजी रेल्वेविरुद्ध होणार आहे.
संक्षिप्त धावफलक :
गोवा : ५० षटकांत ७ बाद २६६ धावा : सुमीरन आमोणकर झे. मंदार गो. संखलेचा ०, अमोघ देसाई पा. गो. बच्छाव ६५, अमित वर्मा झे. मंदार गो. त्रिपाठी ३८, किनन वाझ धावबाद (मुंढे) ३८, दीपराज गावकर (नाबाद) ०, लक्ष्य गर्ग (नाबाद) ०. गोलंदाजी : समद फल्लाह १०-१-४२-२, सत्यजीत बच्छाव १०-०-३८-१.
महाराष्ट्र : ४७.४ षटकांत ५ बाद २६७ धावा : ऋतुराज गायकवाड झे. पांड्रेकर गो. गर्ग ६७, जय पांडे (नाबाद) ११७, श्रीकांत मुंढे (नाबाद) ११. गोलंदाजी : दर्शन मिसाळ ६.४-०-३९-२, अमित वर्मा ५-०-३८-१.