चायना ओपन : किदांबी श्रीकांत, अश्विनी - सात्चिक दुसऱ्या फेरीत


19th September 2018, 05:34 pm
चायना ओपन : किदांबी श्रीकांत, अश्विनी - सात्चिक दुसऱ्या फेरीत

बीजिंग :भारताचा स्टार शटलर किदांबी श्रीकांतने बुधवारी चायना ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये विजयाने प्रारंभ केला. श्रीकांतने पुरुषांच्या एकेरी गटातील पहिल्या फेरीत डेन्मार्कचा खेळाडू रासमूस गेमकेचा पराभव केला. दुसरीकडे सात्विक साईराज रंकिरेड्डी व अश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीनेही पुढच्या फेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानावारील श्रीकांतने रासमूसचा ३० मिनिटांपर्यंत चाललेल्या सामन्यात २१-९, २१-१९ असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. श्रीकांतने पहिला गेम सहज जिंकला मात्र दुसऱ्या गेममध्ये रोमहर्षक खेळ पाहण्यास मिळाला. भारतीय खेळाडूने ४-२ अशी आडि घेतली होती परंतु रासमूसने पुनरागमन करत श्रीकांतविरुद्ध १९-१९ने गेम बरोबरीत आणला. येथून श्रीकांतने रासमूसविरुद्ध दोन गुण ​मिळवत दुसरा गेम २१-१९ने आपल्या नावावर करताना पुढच्या फेरीत प्रवेश केला.
पुढच्या फेरीत श्रीकांतचा सामना थायलंडच्या सप्पानयू अविहिंगसानोनशी होणार आहे. श्रीकांत भारताचा पहिला पुरुष खेळाडू आहे ज्याने हा किताब जिंकला आहे. त्याने २०१४ साली चायना ओपन टुर्नामेंट आपल्या नावावर केला होता. तो दुसऱ्यांदा हा किताब जिंकण्यासाठी सज्ज आहे.
सात्विक व अश्विनी जोडीने मिश्र दुहेरीतील पहिल्या फेरीत इंग्लंडच्या मार्कस एलिस व लॉरेन स्मिथ या जोडीचा पराभव केला. भारतीय जोडीने मार्कस व लॉरेनचा एक तास ३ मनिटापर्यंत चाललेल्या सामन्यात २१-१३, २०-२२, २१-१७ने पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत अश्विनी व सात्विकचा सामना चीनच्या झेंग सिवेई व हुआंग याकियोंग या जोडीशी होणार आहे.