सर्वसमावेशक संघ

शतकाकडे वाटचाल करीत असताना संघ अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक बनला तर विविधतेत एकतेचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या भारतीय समाजाच्या दृष्टीने ते हिताचेच ठरेल.


20th September 2018, 06:00 am


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती ज्यांना ठाऊक आहे त्यांना संघाची गेल्या काही दिवसांतील वाटचाल अचंबित करून सोडणारी ठरली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खरोखरच कात टाकतो आहे की काय असे गंभीरपणे वाटू लागले आहे. संघप्रमुख भागवत यांची अलिकडच्या काही दिवसांतील वक्तव्ये आणि प्रत्यक्ष कृती यात एक सूत्र आहे. त्याचा ताळमेळ घातला तर हे पटते. संघ अापल्या पारंपरिक प्रतिमेला मागे ढकलून आपला चेहरा सध्या अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक करू पाहात असावा. संघासारख्या संघटनेची रचना आणि इतिहास लक्षात घेता ही प्रक्रिया अचानक सुरू झालेली नसणार. आपल्या संघटनेला व्यापक आणि सर्वसमावेशक चेहरा दिल्याशिवाय आधुनिक जगात पाय रोवून राहता येणार नाही, त्यासाठी विचारांची पारंपरिक बंधने बाजूला करून दोन पावले पुढे टाकली पाहिजेत हे सत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेतृत्वाच्या फळीने समजून घेतलेले असावे. संघाची रचना लक्षात घेता त्या शिस्तबद्ध संघटनेत अनपेक्षित काही घडत नसते. त्यामुळे मोहन भागवतांची गेल्या काही दिवसांत ‘धक्कादायक’ विधाने कानावर येत आहेत, ती संघाच्या नियोजनानुसारच असावीत. काहीही निमित्ताने का असेना, स्वत:ला सांस्कृतिक संघटना म्हणवून घेणाऱ्या परंतु भारतीय जनता पक्षाच्या प्रसारासाठी वावरणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोकळेपणाने व्यापक समाजाचा भाग बनण्याचे ठरविले असेल तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे.
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना नागपूरमधील आपल्या मुख्यालयात निमंत्रित करून संघाने आधुनिकीकरणाची अथवा सर्वसमावेशक बनण्याची प्रक्रिया सुरू केली असे म्हणता येईल. त्याआधी संघाने स्वयंसेवकांच्या गणवेशात बहुप्रतिक्षित बदल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा दिल्यानंतर भागवतांनी अशी भाषा ही संघाची संस्कृती नाही असे म्हणून दोन्ही नेत्यांचे कान पिरगाळले होते. आता दिल्लीत ‘भविष्यातील भारत आणि संघाचा दृष्टीकोन’ या बुधवारी संपलेल्या तीन दिवसांच्या परिषदेत भागवतांनी केलेले वक्तव्य प्रसिद्धी माध्यमांतून गाजत आहे. काँग्रेस पक्षाचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असून या पक्षाने देशाला महापुरुष दिले आहेत असे बोलून सरसंघचालकांनी संघाच्या व्यासपीठावरून काँग्रेसची महती गायली आहे. राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्या कोणालाही संघाचा पाठिंबा असतो, तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो असे म्हणून त्यांनी संघ केवळ भाजपशी बांधील नाही असे सुचविण्याचा प्रयत्न केला आहे. संघाशी थेट संबधित नसलेल्या व्यक्तींना संघकार्याची ओळख करून देण्याचा कार्यक्रमही सध्या राबविला जात आहे. येत्या दसऱ्याच्या मुहुर्तावर स्थापनेची ९३ वर्षे पूर्ण करीत असलेली ही संघटना आपल्या कार्याच्या बळावर सर्वदूर विस्तारत आहे. शतकाकडे वाटचाल करीत असताना संघ अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक बनला तर विविधतेत एकतेचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या भारतीय समाजाच्या दृष्टीने ते हिताचेच ठरेल.