सिंधू, सायनाचा ‘चायनीज’ प्रवास मंगळवारपासून


17th September 2018, 04:19 pm
सिंधू, सायनाचा ‘चायनीज’ प्रवास मंगळवारपासून

बीजिंग :भारताची अग्रमानांकीत बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूला जर आंतरराष्ट्रीय सर्किटवर आपले चांगले प्रदर्शन कयम राखायचे असेल व मंगळवारपासून चांगझूमध्ये सुरू होणाऱ्या चायना ओपनचा किताब पुन्हा पटकवायचा आहे तर तिला नव्या उमेदीने खेळावे लागणार आहे.
मागच्या आठवड्यात जपान ओपनच्या दुसऱ्या फेरीत सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला त्यावेळी ती या सामन्यात थकलेली दिसून आली होती. मागच्या वर्षी डेन्मार्क ओपनमध्ये पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर प्रथमच ती एखाद्या टुर्नामेंटमधून लवकर बाद झाली.
२३ वर्षीय सिंधूने चालू सत्रात चांगले प्रदर्शन केले व तीन मोठ्या स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, विश्व चॅम्पियनशिप व आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक पटकावले. ती इंडिया ओपन व थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचण्यातही यशस्वी झाली होती. परंतु व्यस्त कार्यक्रमांमुळे तिला विश्रांती घेण्यास पुरेपूर वेळच मिळाला नाही.
२०१६ साली सिंधूने पटकावला किताब
सिंधूने ७ लाख डॉलर बक्षीस रकमेच्या चायना ओपनचा किताब २०१६ साली पटकावला होता व बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर १००० टुर्नामेंटच्या महिलांच्या एकेरीत किताबाच्या प्रबळ दावेदारांमध्येही तिचा समावेश होता. तिसरे मानांकन प्राप्त सिंधू आपल्या अभियानाची सुरुवात ऑलिम्पिक स्पोर्टस् सेंटर शिनचेंग जिम्नेजियमवर हाँगकाँगच्या च्युंग एनगेन यीविरुद्ध करणार आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन वेळा सुवर्ण पदक पटकावणारी सायना नेहवाल विश्रांती घेऊन पुन्हा एकदा बॅडमिंटन कोर्टवर परतणार आहे. सायनाने विश्रांती घेण्यासाठी जपान ओपनमधून माघार घेतली होती. तिला पहिल्या फेरीत कोरियाच्या सुंग जी ह्युनच्या कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.