स्री- सखा : श्रीगणेश

सुगंध लोकसंस्कृतीचा

Story: पौर्णिमा केरकर |
15th September 2018, 10:07 am
स्री- सखा : श्रीगणेश


-
वेदनेचे- कष्टाचे- संघर्षाचे नाते गाण्यांशी अाहे. अशी गाणी ज्यांनी परंपरेने सोसणे अंगावर काढले, त्यांच्या जगण्याचे चांदणे याच गाण्यांनी केले. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच अपेक्षेचे जगणे जगावे लागले. उंबरठ्याच्या अातील, त्यांच्या खिशाला असंख्य जाचक रुढी, परंपरा श्रद्धा- अंधश्रद्धांनी जखडून ठेवलेले होते. मनाला अभिव्यक्त होण्यासाठी विसाव्यासाठी त्यांना जागाच नव्हती. अशावेळी मात्र सण- उत्सवातून ती स्वत:ला मोकळे करीत गेली. वेदनेला कष्टाला तिने शब्दरूप दिले. त्यातूनच अापल्या लाडक्या दैवताविषयीची श्रद्धा शब्दरूपाने फुगडी, ‘दवली-माण’ च्या गीतातून, शेकडो कथा, कहाण्यांत तिने गुंफली. त्यातून ती श्रद्धा प्रवाहित झाली. बाकी कोणीही तिची वेदना एेकून घेतली नसेल, पण गवर -गणोबा या तिच्या दैवतांनी मात्र तिच्या जीवाला सोसण्याचे अाणि कणखर होऊन जगण्याचे बळ दिले.
जमीन सारयली शेणमातयेन
वयटीक रंगयल्ली कमलावतीन
अशे पुजयले गणपती
आमच्या वडलांचे दवलती
म्हणजे वाडवडिलांपासून चालत अालेली ही परंपरा, हा उत्सव साजरा करताना करावी लागणारी तयारी या गीतात गुंफलेली अाहे. गणेशाच्या जन्माची कुळकथा तर या मालनीनी वैविध्यपूर्ण रितीने समरस होऊन गायिलेली अाहे. पार्वती- गवराई ही तर तिला स्वत:चीच रुपं वाटतात. गणेशाकडे ती पुत्रवत नजरेने पाहाते. त्यासाठीच तो सर्वसामान्यांचा ‘गणोबा’ बनून दवली माणीतून कळत जातो. ‘दवली’ अाणि ‘माण’ ही लोकपरंपरेतील स्वयंपाक घरातील साधने. स्वयंपाकासाठी जसा त्यांचा वापर व्हायचा तसेच ती गुराढोरांसाठीही वापरात यायची. या दवली माणीचाच वापर मग सकाळ संध्याकाळ गणपतीला जागविण्यासाठी ‘नौबत’ म्हणून या मालनी करायच्या. माण उलटी ठेवून त्यावर चुलीतली राख टाकायची अाणि दोन हातात दोन ‘दवल्या- करवंटी- बांबूची काठी यांच्या पासून तयार केलेली दवली’ त्यांना हातात धरून मग सुरु केले जायचे, वादन व गायन.
दवले माणीचा वाजाप
अामचो गणोबा मखरात
अामुची गवुर गोकुळात...
चवथीतले तिचे दिवस जसे शेण-सारवणे, सडा शिंपून सुरु व्हायचे तसेच ती गणपतीला गीतगायन वादनाने उठवायची. स्वयंपाक नैवेद्य यात वेळ कधी सरून जायचा, ते तिचं तिलाही कळत नसे. असे असूनही तिला ‘फुगडी’ घातल्यावाचून स्वस्थ बसवत नसे. किंबहुना दिवसभराचा तिचा सारा शीण फुगडीच्या माध्यमातून कोठल्याकोठे पळून जायचा. घरातील साऱ्याजणी एकोप्याने फुगडीचे सादरीकरण करायच्या. शेजीबाई सुद्धा फुगडीच्या फेऱ्यात सहभागी व्हायची. एकमेकींच्या घरी जाऊन फुगडी घालते.
होई तेवढाच त्यांना विसावा लाभायचा. गणपतीची कुळकथा सांगणारी गणेशाकडे अापले सौभाग्य अबाधित ठेवण्यासाठी मागणं मागणारी फुगडी त्यात हमखास म्हटली जायची.
पार्वतेन एकवात धरीले
लायिल्यो माळ्याक निसणी
काडिले पाच गे नारळ
फोडिले पाच हे नारळ
नारळ कातुनी अंगाक काडीले
अांगीचे मळीचो बाळ सो केलो
बाळाक थेयीले हुंबऱ्यावरी
पार्वती वले उमळूक गेली...
अंगाचा मळ काढून पार्वती बाळाची मूर्ती घडवते. त्याला दरवट्यावर उभा करून ती स्वत:ची कामे करते. शंकर येतात. एक अनोळखी बालक अापली वाट अडवतो, ते पाहून ते क्रोधित होतात. काडिली कमरेची सुरी, मारिली बाळाच्या उरी’ अशी त्यांची प्रतिक्रिया होते. पार्वतीला कळते तेव्हा अाकांत उडतो. हत्तीची मान कापून ती बाळाच्या धडाला लावली जाते, अशीच कथा परंपरेने प्रचलीत असलेली. गाण्यांतून वेगवेगळ्या पद्धतीतून गुंफली जाते. अापण मात्र सुजाणपणे तिचा विचार करूया. ही पार्वती पर्वत धारण केलेली. ती मृण्मयी माती तिच्या अंगाची मळ म्हणजे सुद्धा माती. याच मातीपासूनचा बाळ म्हणजे गणोबा, निसर्गाचे प्रतिक, सर्जक-सृजनाची पार्वती- माती -संस्कृतीचे संचित मनापासून जतन करीत अालेल्या या मालनीला ती अापली, जिवाभावाची वाटली. तिचा पुत्र हा तिला स्वत:चाच वाटला. त्याच्या भोवताली मग कथा- कहाण्या- गीते गुंफली गेली. तिची श्रद्धा त्याच्या एकूणच उत्सवाशी निगडीत राहिली. व्रत उपवासाचा अाधार घेत घेत मग प्रवाहित होत राहिली. स्त्रियांना घरात सन्मान कमीच. त्यात तिला जर मुलगा झाला तर मात्र कुटुंब तिच्याकडे थोड्याफार सन्मानाने पाहायचे, अन्यथा तिच्या हालांना पारावारच नसे. तिलाही अातून वाटत असावे. अापल्यालाही सन्मानाने जगू द्यावे.
‘गणोबा गवर’ माता-पुत्र जोडीने याच उत्सवात पूजले जातात. एकंदरीत चवथ ही कुटुंबाची पूजा असते. माता-पिता अाणि पुत्र यांना एकत्रित प्रतिकात्मकतेने बसवून त्यांच्या प्रती श्रद्धा बाळगून साजरे केले जाणारे उत्सव क्वचितच. गणेश चतुर्थी त्याला अपवाद अाहे. स्त्रीमनाची कलात्मक अभिव्यक्ती यातून जाणवते. हे कुटुंब तिला अापलेसे वाटले. गणोबाला ती जशी मुलाच्या रुपात बघते तसेच तिला तो अापल्या सुखदु:खातील साथीदार सुद्धा वाटला. म्हणून ती त्याच्या समोर नतमस्तक होऊन म्हणते,
गणपती देवा करीन तुझी सेवा, नवस करीन रे
पाच फळांनी, पाच फुलांनी, दूर्वा वाहीन रे
कपाळीचा कुंकू दे जन्मभर अाणि कायी मागेन रे...
(लेखिका लोककला अभ्यासक आहेत.)