विषय आजचे, उद्याचेही

वाचू आनंदे

Story: सखाराम शेणवी बोरकर |
15th September 2018, 10:06 am
विषय आजचे, उद्याचेही


-
लेखकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या पुस्तकांतील विषयांवर केवळ लिहिलेले नाही, तर ते विविध व्यासपीठांवरून मांडले आहेत. या पुस्तकातील लेखांमध्ये विविधता असल्याचे वाचकाला जाणवते. भाषा, संस्कृती, अस्मिता, गोवा, राजकारण वगैरेंवर ते आहेत. पण, आज इतक्या वर्षांनंतरही आम्ही त्याच विषयांचे रवंथ करत आहोत. साहजिकच दोन्ही पुस्तकातील लेखांचे महत्व वाढते.
‘अस्मितायेचो कसाय’ आणि ‘प्रतिक्रियेचें किरायतें’ ही विविधांगी लेख असलेली दोन कोकणी पुस्तके अलीकडेच प्रकाशित झाली आहेत. लेखक आहेत, उदय भेंब्रे. ‘अस्मितायेचो कसाय’ या पुस्तकात भाषा, संस्कृती व अस्मिता या विषयावर लेख आहेत. तर ‘प्रतिक्रियेचें किरायतें’ या पुस्तकात गोवा, गोव्याचे राजकारण व समाजकारण या विषयावर लेख आहेत. पहिल्यात ३२ तर दुसऱ्या पुस्तकात २९ लेख आहेत.
कसाय (काढा) व किरायते (कडू औषधी वनस्पती) ही खास गोव्याची औषधे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही, उलट चांगलाच परिणाम होतो. उदय भेंब्रे आपल्या मनोगतात म्हणतात, ‘माणसाच्या आरोग्याप्रमाणेच लोकशाहीचेही आरोग्य असते आणि ते सांभाळण्यासाठी काढा व किरायते असल्या औषधांची गरज असते. लोकशाहीसंदर्भात ही औषधे म्हणजे लोकमताचे प्रगटीकरण. ते बोलून किंवा लिहूनही केले जाऊ शकते. ते जेवढे प्रभावी ठरते तेवढे लोकशाहीच्या आरोग्यासाठी चांगले.’ लेखक पुढे म्हणतात, ‘अस्मितायेचो कसाय’ च्या प्रस्तावनेला मथळा देताना मी म्हटले होते, विषय आजचे, कदाचित उद्याचेही...! त्यात बदल करून तो ‘विषय आजचे, उद्याचेही’ असा केल्यास तो सत्याचा विपर्यास ठरणार नाही.’
कोकणी, घटक राज्य, गोमंतकीयांचे अधिकार यावर कोणीही पोकळ मुद्दे घेऊन काही गोमंतकीय किंवा परप्रांतीय डोके वर काढतात, तेव्हा त्यांना रोखठोक उत्तर देण्यासाठी या पुस्तकांतील लेख उपयोगी पडतील. जोपर्यंत हे मुद्दे पुढे येणार, तोपर्यंत या पुस्तकांचे महत्व कमी होणार नाही.
यावेळी मला शणै गोंयबाब या महापुरुषाची आठवण येते. त्यांनी लिहिलेले ‘कोंकणी भाशेचें जैत’ हे पुस्तक आजही कोकणीविरुद्धच्या मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी उपयोगी पडतात. या दोन्ही पुस्तकांच्या बाबतीत असेच होईल, याची मला खात्री आहे. या पुस्तकांद्वारे वाचकांचे प्रबोधन तर होतेच, पण सरकार, काही गोमंतकीयांना हवा तेव्हा कडू काढा आणि किरायते देण्याचे कामही हे पुस्तक करते.
‘अस्मितायेचो कसाय’ या पुस्तकाचे मुखचित्र गौरीश वेर्णेकर यांनी तयार केले आहे. तर ‘प्रतिक्रियेचें किरायतें’ पुस्तकाचे मुखचित्र सुषमा कोठारकर यांनी केले आहे. दोन्ही पुस्तके सांगे येथील संजना पब्लिकेशन्स यांनी प्रकाशित केली आहेत.
वृत्तपत्रांमध्ये अनेक लेख येतात. मात्र कालांतराने ते विस्मृतीत जातात. तरीही अशा लेखांचे महत्व तिळमात्र कमी होत नाही. त्यांचे संकलन होणे गरजेचे. संजना पब्लिकेशन्सचे दिनेश मणेरकर यांना या लेखांचे महत्व कळले होते. त्यांनी ते पुस्तक रुपात प्रकाशित करण्याचे ठरविले. नंतर तो विचार प्रत्यक्षात आला. या ऐतिहासिक कार्यासाठी मणेरकर यांचे अभिनंदन. वाचकांनी मुद्दाम ही पुस्तके वाचावीत.
(लेखक साहित्यिक आहेत.)
-----------------------
अस्मितायेचो कसाय, प्रतिक्रियेचें किरायतें
लेखक : उदय भेंब्रे
प्रकाशक : संजना पब्लिकेशन्स, सांगे
पाने : २२७ व १८४, किंमत : प्रत्येकी २०० रुपये