काटा रुते सरकारला!

राज- कथा

Story: संजय ढवळीकर |
15th September 2018, 10:05 am
काटा रुते सरकारला!


...................................
‘‘गोवा विधानसभेत ज्येष्ठतेत पुरुषोत्तम काणेंशी कोणीच स्पर्धा करू शकत नाही. मात्र त्यानंतर सलग निवडणुका जिंकण्यात आघाडीवर अाहेत कमलाक्षदादा केरकर आणि सूर्यकांत कवळेकर. म्हणून प्रकृतीच्या कारणावरून कमलाक्षदादा मुख्यमंत्रिपद सोडणार असतील तर हे पद सूर्यकांत साहेबांकडेच आले पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे...’’ राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आपापली मते मांडत होते.
‘‘सद्यःस्थितीत वेगवेगळ्या घटकांचे हे सरकार कार्यक्षमतेने चालवण्यासाठी प्रभावी नेतृत्वाची गरज आहे, फक्त विधानसभेतील ज्येष्ठतेचे दावे करून चालणार नाही. कमलाक्षदादा उपचारांसाठी परदेशात असताना गोवर्धन भाटकारांनी आपल्या खात्यांचा कारभार सर्वांत प्रभावीपणे सांभाळला आहे. तरुण आणि धडाडीचा नेता म्हणून मुख्यमंत्रिपद भाटकारांकडेच सोपवले गेले पाहिजे...’’ गोवा मूव्हर्स पक्षाच्या समन्वय समितीच्या बैठकीत हा एकच मतप्रवाह होता.
कमलाक्षदादांच्या प्रकृतीचा विषय ऐरणीवर येताच सरकारच्या घटक पक्षांत चढाओढ लागली होती, ती सरकारचे नेतृत्व आपल्याकडे मिळवण्याची. कमलाक्षदादांच्या मुख्यमंत्रिपदाखाली सरकार स्थापन होऊन दीड वर्षच उलटले होती. तरी अचानक उद्भवलेल्या दादांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रहित पक्षाचा खरे तर पराभवच झाला होता. एकवीसवरून त्यांच्या आमदारांची संख्या तेरावर घसरली होती. मुख्यमंत्री केशवानंद परबांसह निम्मे मंत्रिमंडळ पराभूत होऊन घरी बसले होते. राष्ट्रीय काँग्रेसला मात्र ध्यानीमनी नसताना सतरा जागांची बक्षिसी मतदारांनी दिली होती. परंतु राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल ना राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाला विश्वास, ना गोवा मूव्हर्स पक्षाला प्रेम! त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन तीन अपक्षांनाही साथीला घेतले आणि भारतीय राष्ट्रहित पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेचा हा खटाटोप करणाऱ्या सर्व घटकांची अट एकच होती - कमलाक्षदादा मुख्यमंत्रिपदी असले पाहिजेत.
त्यांच्या एकमुखी आग्रहावरून कमलाक्षदादांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देत दिल्लीतून गोव्यात येण्याचे पाऊल उचलले. गोव्यासारखे छोटे राज्य असले तरी एकही राज्य हातचे गमवायचे नाही या धोरणास अनुसरून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वासमोर कमलाक्षदादांना गोव्यात पाठवण्याशिवाय गत्यंतर उरले नाही.
आम्हाला मंत्रिपदे कोणतीही मिळोत, सरकारची धोरणे काहीही असोत; परंतु मुख्यमंत्री म्हणून कारभार हाकण्यासाठी त्या खुर्चीत कमलाक्षदादाच असले पाहिजेत. कमलाक्षदादा आहेत तोपर्यंत आम्ही सरकारात आहाेत असे राष्ट्रप्रेमी गोमंतकचे नेते सूर्यकांत कवळेकर, गोवा मूव्हर्सचे नेते गोवर्धन भाटकार तसेच तीनही अपक्षांनी जाहीरपणे सांगून टाकले होते. दादांच्या प्रकृतीचा प्रश्न उद्भवला तेव्हाही नेतृत्वात बदल करण्याची मागणी त्यांनी केली नव्हती.
‘‘कमलाक्षदादांना उपचार घेऊन बरे होऊंद्या. ते परदेशातून परतेपर्यंत आम्ही मंत्री आपापल्या खात्यांचा कारभार चालवतो. यात काही अडचण येणार नाही,’’ असे त्यांनी स्पष्ट केले होते.
कमलाक्षदादांचा आजार वाटतो तेवढा सोपा नाही, त्याचे स्वरुप दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे, हे लक्षात आल्यानंतर मात्र सरकारमधील घटक पक्षांत चलबिचल सुरू झाली. राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाच्या आणि गोवा मूव्हर्स पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आपापसांत चर्चा सुरू केली. सरकारातील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रहित पक्षाकडे कमलाक्षदादा वगळता नेतेपद सांभाळू शकतील असे दुसरे नेतृत्व नव्हते. विधिमंडळ पक्षाच्या नेतृत्वाची संपूर्ण दुसरी फळीच गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या माध्यमातून कापली गेली होती. दुसरी फळी अस्तित्वात नसल्यामुळे वेळ पडली तर भारतीय राष्ट्रहित पक्षाचे नेतेपद कोणाकडे सोपवायचे हा प्रश्न अनुत्तरित बनला.
त्यामुळे सरकारकडे बहुमत आहे, पण सरकारचे नेतृत्व करायचे कोणी? हा राजकीय पेच विलक्षण असाच होता.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाचे नेते सूर्यकांत कवळेकर यांनी पुढाकार घेऊन कमलाक्षदादांची भेट घेतली. गेल्या सलग पाच निवडणुकांत मोठ्या फरकाने विजयी होत आलेल्या कवळेकरांनी एक स्थिर आणि भक्कम राजकारणी अशी गोव्याच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली होती. एका टर्मचा अपवाद वगळता त्यांनी भारतीय राष्ट्रहित पक्षासोबत राहणे कायम पसंत केले होते. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. कमलाक्षदादांच्या गैरहजेरीत जर सरकारचे नेतृत्व कोणी करायचे झालेच तर आपले नाव भारतीय राष्ट्रहित पक्षाच्या नेत्यांच्या तोंडावर असले पाहिजे, अशी परिस्थिती कवळेकरांनी निर्माण करून ठेवली होती. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडेही त्यांची नियमित उठबस असायची.
भारतीय राष्ट्रहित पक्षाच्या नेत्यांकडील कवळेकरांची नेमकी ही उठबस भाटकारांना खुपू लागली होती. नेतेपद कवळेकरांकडे जर जाऊ शकते तर आपल्याकडे का नाही, असा प्रश्न अलिकडच्या काळात भाटकारांच्या मनात वारंवार येऊ लागला होता. परंतु आपणच थेट तसे म्हणणे राजकीय परिपक्वतेचे ठरणार नाही एवढे त्यांना कळत होते. त्याबरोबर त्यांनी गोवा मूव्हर्समधून कुजबुज आघाडी तयार केली. कवळेकरांच्या नेतेपदाला आपला विरोध असेल हा मुद्दा गोवा मूव्हर्सच्या कुजबुज आघाडीने लावून धरला.
ही कुजबुज कमलाक्षदादांपर्यंत पोहोचावी अशी व्यवस्था चाणाक्षपणे भाटकारांनी करून ठेवली. कमलाक्षदादांपर्यंत ही चर्चा पोहोचल्याची पोचही भाटकारांना मिळाली. दादांनी भाटकारांना चर्चेसाठी बोलावले.
‘‘गोवर्धन, सरकारचा प्रमुख या नात्याने नेतेपदाबाबत निर्णय घेण्याचा मला सर्वात जास्त अधिकार आहे. या घडीला सूर्यकांतकडे नेतृत्व सोपवण्याचा माझा विचार आहे, तो ज्येष्ठ आहे, सर्वांना त्याचे नाव मान्य होईल.’’ दादांनी सुरुवात केली.
‘‘पण मला मान्य नाही ना तुमचा निर्णय. सूर्यकांत विधिमंडळ राजकारणात ज्येष्ठ असला तरी मंत्रिमडळात मीही ज्येष्ठ आहे. नेतेपदासाठी माझ्या नावाचा विचार व्हावा. मी तुमच्या कलानेच सरकार चालवेन याची खात्री देतो.’’ भाटकारांनी आपले प्यादे ठामपणे पुढे सरकवले.
‘‘हे बघ गोवर्धन, आमच्या पक्षाच्या नेत्यांनाही सूर्यकांत मान्य आहे. तुझ्याबाबत तसे सांगता येत नाही हे तुलाही ठाऊक आहे. फक्त नेतेपद सोपवून चालणार नाही, सरकार चालवायचे आहे पुढे.’’
‘‘सरकार तर आताही चालूच आहे ना. प्रत्येक मंत्री आपापले काम करतोय. दादा, तुम्ही आराम करा. मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच या पदावर राहा. आम्ही काम करतो, सरकार कार्यक्षमतेने चालू ठेवतो.’’ भाटकार ऐकायच्या तयारीत नाहीत हे कमलाक्षदादांनी जाणले.
प्रकृती साथ देत नाही, आरामाची गरज आहे हे कमलाक्षदादांना पटत होते. पडून असलेली कामे उरकण्याची कितीही दांडगी हौस असली तरी शरीर तेवढी साथ देत नाहीये. म्हणून नेतेपदी आपल्या विश्वासातील आणि सर्वांना मान्य असेल असा नेता बसवला की सरकार सुरळीत चालू शकेल असा त्यांचा विचार. या विचारातूनच त्यांनी सूर्यकांत कवळेकरांचे नाव पक्के केले होते. परंतु भाटकारांनी त्यावर शिक्कामोर्तब होऊ दिले नाही. मुळात कमलाक्षदादा मुख्यमंत्री असावेत या अटीवरच हे सरकार अस्तित्वात आले होते. आणि आता गोवर्धन भाटकार तडजोडीची तयारी न दाखवता अडून बसले होते. पण त्यांच्याकडे नेतृत्व सोपवणे भारतीय राष्ट्रहित पक्षातील कोणालाच मान्य नव्हते.
आणखी काही दिवस हा पेच अनिर्णीत राहिला. तरी जास्त दिवस असेच जाऊ देणे शक्य नव्हते. आता मार्ग एकच होता. सरकारच्या वाटेत रुतून बसलेला काटा दूर करणे हाच एकमेव मार्ग होता.
भाटकारांच्या गोवा मूव्हर्सचे एकूण तीन आमदार. तीनही मंत्री. भाटकार वगळून रुपेश अडवलपालकर आणि विश्राम पार्सेकर या बहुजन समाजातील तरुण चेहरा असलेल्या दोन्ही मंत्र्यांना कमलाक्षदादांच्या घरी भेटीसाठी निमंत्रण मिळाले. प्रस्ताव स्पष्ट होता... ‘‘गोवा मूव्हर्स ही गेल्या निवडणुकीत उगवलेली अळंबी आहे, या पक्षात राहून पुढील निवडणुकीत तुम्हाला भवितव्य नाही. भाटकाराची साथ सोडा, मी तुम्हाला भारतीय राष्ट्रहित पक्षाचीच उमेदवारी देतो.’’
रुपेश आणि विश्राम गेल्या निवडणुकीत भाजपच्या विरोधातील नकारात्मक मतांवर निवडून आले होते. स्वत:चा असा राजकीय पक्ष नव्हता, गोवा मूव्हर्सचे आमदार असले तरी तो पक्ष आणि भाटकार यांच्याबद्दल प्रेम असण्याचे कारण नव्हते. उलट कमलाक्षदादांकडून इथे त्यांना मंत्रिपद शाबूत ठेवून पुढील निवडणुकीत भारतीय राष्ट्रहित पक्षाच्या उमेदवारीची हमी मिळत होती. त्यांनी लगेच होकार देऊन टाकला. त्याच बैठकीत बेत निश्चित झाला. गोवर्धन भाटकारचे काहीही झाले तरी रुपेश आणि विश्राम सरकारात कायम राहतील आणि भारतीय राष्ट्रहित पक्षाचे सदस्य असल्याप्रमाणेच त्यांना भविष्यात आदर मिळेल, हे ठरले.
लगोलग सूर्यकांत कवळेकरांना निरोप गेला. सरकारचा ताबा त्यांना घ्यायचा होता. कमलाक्षदादा मुख्यमंत्रिपद सोडून एक साधे आमदार म्हणून राहणार होते. त्यांच्या सल्ल्याने कवळेकर सरकार चालवणार होते. कवळेकरांना विरोधाचा आपला हट्ट चालू ठेवलेल्या गोवर्धन भाटकारचा सरकारच्या मार्गात रुतणारा काटा अलगद काढून टाकण्याची राजकीय शस्त्रक्रिया कमलाक्षदादांनी लीलया पार पाडली होती.
.............
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे संपादक आहेत.)
......................
(या कथेतील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक असून वास्तवाशी त्यांचा कोणताही संबंध नाही.)