पणजीत घराघरात वाटणार कापडी पिशव्या : कुंकळ्येकर


08th September 2018, 06:26 pm


प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी:

प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे पणजी शहरातील घराघरात वाटप केले जाणार आहे. गोवा आर्थिक विकास महामंडळ, महालक्ष्मी ट्रस्ट यांच्यामार्फत या पिशव्या वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये मासळीसाठी वेगळी व इतर साहित्य नेण्यासाठी वेगळी अशा दोन प्रकारचा समावेश आहे, असे सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले.

कापडी पिशव्या महाग पडत असल्याने ग्राहकांना माल देताना दुकानदार त्या पिशव्यांचीही किंमत मालामध्ये सामाविष्ट करत असल्याने ग्राहकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसू शकतो. त्यामुळे आर्थिक विकास महामंडळाने मोफत पिशव्या वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आर्थिक विकास महामंडळ या ​पिशव्या बचतगटांकडून तयार करुन घेणार असून त्यामुळे त्यांनाही रोजगार प्राप्त होणार असल्याचे कुंकळ्येकर यांनी सांगितले.

पणजी महानगरपालिकेने २ ऑक्टोबरपासून पणजी शहरात सर्वच प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याला जनतेने सहकार्य करणे आवश्यक आहे. जनतेने सहकार्य केल्याशिवाय कोणताच प्रयत्न यशस्वी होत नसतो. त्यामुळे प्लास्टिक बंदीला प्रोत्साहन देऊन पर्यावरण रक्षणाचे भान सर्वांनी जपावे, असे आवाहन कुंकळ्येकर यांनी केले.


इडीसी कर्मचाऱ्यांना एलईडी बल्बचे वितरण

एलईडी बल्बमुळे वीज बिल कमी येते. त्याचा वीज बचतीसाठी लाभ होतो. त्यामुळे इडीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना इडीसीमार्फत एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले.                     

हेही वाचा