केरळमध्ये अडकलेले गोवेकर सुखरूप

मांद्रेतील बारा जण आज गोव्यात  कुटुंबियांकडून समाधान


19th August 2018, 12:45 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पेडणे : केरळमध्ये देवदर्शनासाठी गेलेले आणि तेथील महापुरात अडकून बसलेले आश्वे-मांद्रे येथील १२ जण तसेच फोंडा, मडगाव परिसरातील शंभरपेक्षा अधिकजण सुखरूप असून, आश्वे-मांद्रेतील १२ जण रविवारी गोव्यात परतणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मांद्रेतील १२ जणांना केरळहून बंगळुरु येथे आणण्यात येणार आहे. तेथून त्यांना गोव्यात आणण्यासाठी उद्योजक जीत आरोलकर शनिवारी आपल्या मित्रांसह बंगळुरुला रवाना झाले आहेत.

दरम्यान, मुरिंनगोर-चालाकुडी येथील प्रसिद्ध रिट्रीट प्रार्थनास्थळाला भेट देण्यासाठी गोव्यातील शंभरपेक्षा अधिक जण १० ऑगस्ट रोजी मंगला एक्स्प्रेस गाडीने केरळला गेले व तेथे आलेल्या महापुरात अडकून पडले. त्यामुळे गोव्यात खळबळ माजली असून, केरळमध्ये अडकलेल्या गोवेकरांच्या सुटकेसाठी ठिकठिकाणी प्रार्थना करण्यात येत आहेत. अनेकजण आपापल्या परीने त्यांना मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योजक जीत आरोलकर यांनी केरळ नौदलात कार्यरत असलेल्या आपल्या मित्रांशी संपर्क साधून त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. 

कुटुंबियांचे डोळे ‘त्यांच्या’ वाटेकडे 

गेल्या चार दिवसांपासून केरळमधील महापुरात अडकून बसलेले सर्वच गोमंतकीय सुखरूप असल्याची माहिती मिळताच जीत आरोलकर यांच्यासह मांद्रेतील नागरिकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आहे. अडकलेल्यांचे कुटुंबिय त्यांच्या परतण्याकडे डोळे लावून बसले आहेत.