डिचोलीत गोहत्या समर्थनाविरोधात आंदोलन

गोप्रेमींकडून मातीच्या मडक्या फोडून सरकार, मंत्र्यांचा निषेध


20th August 2018, 12:36 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली :
गोवंशाची, गोमातेची हत्या करण्यासाठी गोवा सरकार व त्यातील मंत्री हे पूर्णपणे समर्थन करत आहेत. याविरोधात शनिवारी गोसंवर्धन संस्था व गोप्रेमी संघटनांनी राज्य सरकार व सात मंत्र्यांच्या नावाने मातीच्या मडक्या फोडून निषेध नोंदवला.
यावेळी श्रीराम गोसंवर्धन केंद्राचे हनुमंत परब, कमलेश बांदेकर, अमृत सिंग, लक्ष्मण जोशी, भोलानाथ गाड, शैलेश वेलिंगकर, गोपाळ बांदिवळी, माधव विर्डीकर, आनंद गाड, शैलेश फातर्पेकर आदींनी या आंदोलनात सहभाग दर्शविला. रामाची भाषा करणारे सरकारातील नेते आता गोमातेवरच सुरा खुपसण्यासाठी सरसावले अाहेत. हे पाप करणाऱ्या व याचे करणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आम्ही कुणाच्याही विरोधात नाही, मात्र गोमातेची खुलेआम होणारी कत्तल, अत्याचार व त्याला सरकारने दिलेले पाठबळ कदापि सहन व खपवून घेणार नाही. डिचोलीतून सुरू झालेले हे आंदोलन पूर्ण राज्याच्या कानकोपऱ्यात नेऊन सरकार व मंत्र्याचा निषेध निषेध नोंदवणार, असे हनुमंत परब व शैलेश वेलिंगकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी गोवा सरकार तसेच मंत्री मॉविन गोदिन्हो, फ्रान्सिस डिसोझा, रेजिनाल्ड, विश्वजीत राणे, विजय सरदेसाई, मायकल लोबो यांचा गोप्रेमींनी निषेध नोंदवला. एका रांगेत बुडकुले ठेवून ते काठीने फोडण्यात आले. यावेळी विविध महिला व नागरिक फलक घेऊन उपस्थित होते.
फोटो :
मातीच्या मडक्या फोडून निषेध करताना गोप्रेमी हनुमंत परब, शैलेश वेलिंगकर, अमृत सिंग, कमलेश बांदेकर व इतर. (विशांत वझे)