जैव शौचालयांसाठी निविदा जारी


20th August 2018, 12:24 am

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : जमिनी नसल्याने शौचालय उभारण्यास अडचणी असलेल्यांना तसेच ज्यांच्या घरी शौचालय नाही, अशा राज्यातील ६० हजार घरांना जैव शौचालयांचा पुरवठा करण्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने निविदा काढली आहे. यासाठी सप्टेंबर मध्यापर्यंत पुरवठादार कंपनी निश्चित केली जाईल. पात्र कंपनीने पुढील ९० दिवसांत शौचालयांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यात घरोघरी शौचालयांची संकल्पना पूर्ण होऊ शकते.

सिंगल पॅन बायो-डायजेस्टर, ७०० लीटरची क्षमता असलेली बायो-टँक व एक बाय एक मीटर अशा आकाराचे व भूमिगत सोकपिट अशी व्यवस्था असलेल्या जैव शौचालयांचा पुरवठा करण्यासाठी महामंडळाने निविदा मागविली आहे. ही निविदा १.४४ कोटी रुपये खर्चाची असून, ९० दिवसांत काम पूर्ण करायचे आहे, असे महामंडळाने म्हटले 

आहे. 

दरम्यान, डिसेंबर २०१८ पर्यंत राज्याला उघड्यावरील शौचपासून मुक्त करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. त्यासाठी पंचायत खात्याने राज्यात शौचालय नसलेल्या घरांचा सर्व्हे केला. त्यात सुमारे ६० हजार घरांना शौचालयांची आवश्यकता असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा घरांना तत्काळ शौचालये पुरविण्याचे काम सरकारने कचरा व्यवस्थापन महामंडळाला दिले आहे. 

 १० सप्टेंबरला पात्र निविदा उघडल्यानंतर जे पुरवठादार पात्र ठरतील, त्यांना जैव शौचालय कशा स्वरूपाचे असेल याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी महामंडळ सांगेल त्या ठिकाणी तशा प्रकारचे शौचालय उभारावे लागणार आहे. त्यानंतरच पात्र कंपनीची घोषणा होणार आहे.