रेरा कायद्यामुळे बांधकाम व्यवसायात पारदर्शकता : पुत्तुराजू


20th August 2018, 12:22 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : देशात जमीन खरेदी- विक्री बाजार व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांच्या किमतींवर नियंत्रण नाही. अशा परिस्थितीत बिल्डर आणि खरेदीदार यांच्यातील आदान- प्रदानामध्ये संतुलन निर्माण करणे, प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करणे आणि पारदर्शक पद्धतीने व्यवहार करण्यास ‘रेरा’ने भाग पाडले आहे, असे मत राज्याचे मुख्य नगर नियोजन अधिकारी डॉ. एस. टी. पुत्तुराजू यांनी शनिवारी मिरामार येथे केले. 

द इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स इंडियाने (आयईआय) रेरा- गोवा, गोवा सरकार आणि क्रेडाई यांच्या सहकार्याने आयोजित ‘रेरा : अ चेंज मॅनेजमेंट एक्सरसाईझ’ या दोन दिवसीय परिषेदच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पुत्तुराजू उपस्थित होते. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष डॉ. देश प्रभुदेसाई, आयईआयचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक पर्रीकर, सचिव दीपक करमलकर, आयोजन समितीचे चंद्रशेखर प्रभुदेसाई आणि दत्ता कारे आदी उपस्थित होते. यावेळी पुत्तुराजू म्हणाले, ‘रेरा’मुळे जसा खरेदीदाराला फायदा झाला आहे. तसाच बिल्डरांनाही लाभ होत आहे. बिल्डर आणि खरेदीदार यांच्यातील वादही कमी होत आहेत. रेरामुळे बिल्डरना पारदर्शकता राखावी लागत आहे. ज्याचा लाभ खरेदीदाराला होतो. त्याबरोबरच रिअल इस्टेटमधील गुंतवणूक वाढीलाही चालना मिळाली आहे.

 क्रेडाईचे डॉ. प्रभुदेसाई म्हणाले, या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे या व्यवसायात अधिक पारदर्शकता व व्यावसायिकता आली. रेराने दिलेल्या जबाबदारीमुळे बांधकामेही दर्जेदार होण्यास मदत होत आहे.                               

आयईआयचे अध्यक्ष नाईक पर्रीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चंद्रशेखर प्रभुदेसाई आणि दत्ता कारे यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. योगिता कारखानीस यांनी सूत्रसंचालन केले.