नागरिकांचे तीन दिवस पाण्याविना हाल


19th August 2018, 02:30 am


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : तिसवाडी तालुक्याला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन ओपा (कुर्टी) येथे फुटल्याने गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. काही भागात कमी दाबाने व काही मिनिटेच पाणी आल्याने तिसवाडीतील नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. त्यामुळे तिसर्‍या दिवशीही नागरिकांचे हाल झाले.
तिसवाडी तालुक्यातील पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा करणारी ७५० एमएम जलवाहिनी कुर्टी येथे फुटली होती. ती दुरुस्त करण्यात आली असली तरी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून या शहरांना पाणीपुरवठा होत नाही. एअरलॉकमुळे सहा मीटर जलवाहिनीला तडा गेला अाहे. तसेच ही जलवाहिनी डोंगराळ भागात फुटल्याने दुरुस्ती करण्याच्या कामाला उशीर झाला होता. या प्रकारामुळे ऐन पावसाळ्यात तिसवाडी तालुक्यातील शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. गुरुवारपासून पणजी, सांताक्रुझ, ताळगाव शहराला पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले.