गोवेकरांच्या ह्रदयात वाजपेयींचे स्थान अटल

हा कवीमनाचा राजकारणी गोव्यातील शेती-बागायती, निसर्गसुंदर डोंगर आणि रम्य समुद्रकिनारे यांच्या जेवढा प्रेमात पडला त्याहून काकणभर अधिकच प्रेम गोवेकरांनी त्यांच्यावर केले.

Story: अग्रलेख |
18th August 2018, 06:00 am

जगाने बघितलेल्या भारतातील सर्वोत्तम पंतप्रधानांपैकी एक असलेले अटलबिहारी वाजपेयी शुक्रवारी अनंतात विलीन झाले. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे गेले दशकभर तसे ते सार्वजनिक जीवनापासून दूरच होते. दिल्लीतील आयुर्विज्ञान संस्थेत चालू असलेल्या उपचारांना प्रतिसाद मिळून त्यांचे प्राण वाचावेत म्हणून देशभरात प्रार्थना चालू होत्या, तशाच गोव्यातूनही सर्व जाती-धर्माच्या लोकांकडून वाजपेयींना आराम वाटावा यासाठी प्रार्थना होत होत्या. परंतु त्यांचा जीवनप्रवास इथेच थांबला. देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि पुढच्याच दशकात वाजपेयी जनसंघाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय बनले. देशभरात त्यांचा संचार सुरू झाला. ब्रिटिश राजवटीतून देश स्वतंत्र झाला असला तरी पोर्तुगीजांच्या बंधनात अडकलेल्या गोव्याला मात्र पारतंत्र्यातून मुक्त होऊन राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी चौदा वर्षांची वाट बघावी लागली. १९६१ मध्ये गोवा मुक्त झाला, १९६३ मध्ये राज्यात पहिली विधानसभा निवडणूक घेण्यात आली. वाजपेयींचे गोव्यातील पहिले आगमन १९७० दशकाच्या पूर्वार्धात झाले. तेव्हापासून या व्यक्तीने गोव्यावर आणि गोवेकरांवर मोहिनी घालण्यास सुरुवात केली. त्यांचे अमोघ वक्तृत्व ऐकण्यासाठी जमणाऱ्या गर्दीचे प्रमाण त्यांच्या दर भेटीमागे वाढत गेले. दिवसभराच्या कामकाजानंतर कधीतरी त्यांच्या मुखातून त्यांच्या कविता ऐकण्याचा योग काही नशिबवानांना मिळत गेला. त्यांच्या परिघात जमणाऱ्या कार्यकर्त्यांना वाजपेयींच्या अनमोल मार्गदर्शनाचा लाभ होत गेला. अनेकांना वाजपेयींच्या पक्षाबद्दल आक्षेप असतील, परंतु उर्वरित देशाप्रमाणेच अटलबिहारी वाजपेयी या व्यक्तीला गोव्यातही कोणी विरोध केला नाही, तशी गरजही वाटली नाही. गोव्याने या दिलदार नेत्यावर निर्व्याज प्रेम केले!

अटलबिहारी वाजपेयींच्या अनेक जुन्या-नव्या आठवणींचा संचय गोव्यातील राजकीय नेत्यांबरोबरच समाजकारण, कला, साहित्य, उद्योग, व्यवसाय अादी क्षेत्रांतील व्यक्तींपाशीही आहे. १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू झाली. त्याआधी १९७० दशकाच्या सुरुवातीला वाजपेयी गोव्यात आले असता वास्को, मडगाव या ठिकाणी त्यांचे वास्तव्य आणि कार्यक्रम झाले. विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकरांचे वडील दादा आर्लेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील एक संस्थापक नेते. गोव्यात वाजपेयी त्यांच्या साध्याशा घरात राहायला असत. पणजीतील मांडवी हॉटेलमध्ये कामकाजाची बैठक आटोपल्यानंतर मिरामार समुद्रकिनाऱ्यावर रात्रीचे जेवण घेण्याचे ठरले, तेव्हा फारसे परिचित नसलेल्या वाजपेयींना शर्ट आणि पँट अशा नवीन वेशात बघून उपस्थितांना गंमतच वाटली. दिल्लीत परत जाताना राजेंद्र आर्लेकरांच्या स्कूटरवर हातात आपली बॅग धरून हा भावी पंतप्रधान बसला आणि विमानतळावर गेला, ही आठवण आर्लेकर सांगतात. पणजीतील माधव धोंड यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे वाजपेयी त्यांच्याकडे जेवायला अवश्य असत. त्यांना माशांचे जेवण प्रिय असायचे अशी आठवण माधव धोंड हयात असताना सांगायचे. मडगावात जाहीर सभेला परवानगी नाकारल्यामुळे नगरपालिका इमारतीसमोर एका टेबलवर उभे राहून वाजपेयींनी ओघवत्या शैलीत भाषण करताना आपल्याला अटक करून दाखविण्याचे आव्हान दिले, या आठवणी मडगावकरांच्या मनात ताज्या आहेत. आणीबाणीनंतर सत्तेत अालेल्या जनता पक्षाच्या सरकारात पराष्ट्रमंत्री बनलेले वाजपेयी नोव्हेंबर १९७७ मध्ये फर्मागुडी येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले तेव्हा त्यांना ऐकण्यासाठी हजारो गोवेकरांनी कान टवकारून गर्दी केली होती!

नवीन सहस्त्रक सुरू होण्याआधीच १९९० दशकात वाजपेयींचा भारतीय जनता पक्ष काही राज्यांत तसेच केंद्रातही सत्तेची चव चाखू लागला होता. गोव्यातही १९९४ मध्ये भाजपचे चार आमदार निवडून आले होते. पराभवातून विजयाची गुढी रोवायची असते असा संदेश देणाऱ्या वाजपेयींचे गोवा दौरे त्यानंतर राजकीय प्रचारासाठी अधिक होऊ लागले. मार्च २००२ मध्ये पर्वरीतील नवीन विधानसभा संकुलाचे उद्घाटन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाने झाले. २००२ मध्ये भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन गोव्यात झाले. तेव्हा तसेच त्याच वर्षी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा विसर्जित करून नव्याने निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरविले तेव्हा वाजपेयींच्या जाहीर सभांना विराट गर्दी जमली. पर्रीकर, श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर या भाजपच्या ज्येष्ठांच्या चौकडीने वाजपेयींना गुरुस्थानीच मानले आहे. हा कवीमनाचा राजकारणी गोव्यातील शेती-बागायती, निसर्गसुंदर डोंगर आणि रम्य समुद्रकिनारे यांच्या जेवढा प्रेमात पडला त्याहून काकणभर अधिकच प्रेम गोवेकरांनी त्यांच्यावर केले. वाजपेयींना गोवेकरांनी अापल्या ह्रदयात दिलेले स्थान अटल अाहे.