सारे काही फक्त मुख्यमंत्रिपदासाठी

राज- कथा

Story: संजय ढवळीकर |
18th August 2018, 04:09 pm
सारे काही फक्त मुख्यमंत्रिपदासाठी


..........................
निवडणूक होऊन नवीन सरकार आले की ते पाच वर्षांसाठी टिकणारे आहे असे मानण्याचे ते दिवस होते. गोवा १९६१ मध्ये मुक्त झाला आणि १९६३ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक झाली. तेव्हापासून सुरू झालेल्या विधानसभा निवडणुकांचा सिलसिला तीसेक वर्षे सुरळीत चालू होता. १९७७-८० दरम्यानचा एकमेव अपवाद वगळता दर पाच वर्षांनी विधानसभेची निवडणूक व्हायची. या निवडणुकीतून सत्तेत आलेले मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार पाच वर्षे टिकायचे.
मुक्तीनंतर तीन दशकात या राज्याने फक्त तीनच मुख्यमंत्री बघितले, मात्र त्यानंतरच्या तेरा महिन्यात चार मुख्यमंत्री झाले! सुजाण मतदारांना हे काय चाललेय ते कळेना झाले. राजकीय स्थैर्य संपुष्टात आले आणि राज्याच्या राजकारणाचे तीन तेरा वाजले. आधी १९९० च्या सुरुवातीला काँग्रेस पक्षात फूट पडली, लुर्दीस बाप्तिस्ता आणि सिरील कॉन्सेसांव यांच्या नेतृत्वाखाली आठ आमदार राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर वर्षभरातच दुसरा महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्कर नाईनकर यांनी सात जणांसह आपल्या पक्षाला रामराम ठोकला. दोन्ही वेळा सरकारे बदलली.
विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर किमान दोन-तीन टर्म तरी आमदार म्हणून विधानसभेत बसावे लागते. विषयांचा राजकारणाचा अभ्यास करावा लागतो. अशी तयारी झाल्यानंतर आपल्याला मंत्री बनण्याची आकांक्षा बाळगता येईल, असा नेम पूर्वीच्या राजकारणात ठरून गेला होता.
परंतु इथे झाले भलतेच. कालच्या निवडणुकीत प्रथमच आमदारकीची झूल अंगावर पडलेल्या नेत्याला थेट मंत्रिपद हवे वाटू लागले. १९९० मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटात त्यातल्या त्यात ज्येष्ठ नेते होते लुर्दीस बाप्तिस्ता. सभापतिपदी असतानाच त्यांनी पक्षांतर केले, मुख्यमंत्री बनण्यासाठी. पुरुषोत्तम काणे आणि विल्सन डायस सक्रिय असेपर्यंत आपल्याला या पक्षात राहून मुख्यमंत्री नाही बनता येणार, याची खूणगाठ बाप्तिस्ता यांनी मनाशी बांधली होती. म्हणून पक्षाशी काडीमोड घेत सभापतिपदावर लाथ मारून लुर्दीस बाप्तिस्ता यांनी राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाशी हातमिळवणी करत पक्षांतर केले होते.
सिरील कॉन्सेसांव यांची तर कथाच वेगळी. पहिल्यांदाच निवडून आल्या आल्या काणे सरकारात त्यांना क्रीडा आणि पर्यटन या खात्यांचे मंत्री बनायचे होते. इतर काही ज्येष्ठ सदस्यांना डावलून मंत्रीपद देण्याची त्यांची मागणी पुरुषोत्तम काळे यांनी पूर्ण केली नाही, म्हणून सिरील कॉन्सेसांव यांनी तडकाफडकी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. नवीन सरकारात मात्र त्यांचे मंत्रिपद निश्चित होते. परंतु झाले असे की, लुर्दीस बप्तिस्ता सभापती पदावरून मोकळे झाल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाचा ताबा घेऊ शकणार होते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सोळा दिवसांचा अवधी लागणार होता. या काळात अन्य कोणीतरी मुख्यमंत्रिपदी बसणे आवश्यक होते. अशा परिस्थितीमुळे कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सिरील कॉन्सेसांव यांना या राजकीय अपघातात थेट मुख्यमंत्री बनता आले. भले मग सोळा दिवसांसाठी का असेना!
यामुळे १९८९ वर्षाच्या अखेरीस झालेली विधानसभा निवडणूक राज्याच्या दृष्टीने खूपच अनिष्ट पायंडे घालणारी ठरली. मुळात राष्ट्रीय काँग्रेसला २० आणि राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाला १८ जागा मिळाल्या होत्या. सरकार स्थापन करण्याच्या खेळात तज्ज्ञ असलेल्या काणेंनी एका अपक्षाचा पाठिंबा मिळवत आपले सरकार स्थापन केले खरे. परंतु बाप्तिस्ता-कॉन्सेसांव यांच्या महत्वाकांक्षी राजकारणाच्या वादळात काणे सरकार सुरुवातीपासूनच हेलकावे खाऊ लागले. परिणामत: तिसऱ्या महिन्यातच सरकार कोसळले. राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाच्या १८ आमदारांच्या सहभागातून जे आघाडी सरकार सत्तेत आले त्याचे मुख्यमंत्री म्हणून सिरील कॉन्ससांव यांनी शपथ घेतली.
‘‘मी सोळा दिवस मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी इथे आलो आहे. मी शब्दाला जागणारा माणूस असून सतराव्या दिवशी मी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडेन, त्याच दिवशी आमचे नेते बाप्तिस्तांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झालेला तुम्ही बघाल.’’ कॉन्सेसांव यांनी शपथविधीनंतर लगेचच स्पष्ट केले होते.
पुढील सतरा दिवसांत त्यानुसार अपेक्षित घडामाेडी होत गेल्या. राष्ट्रीय काँग्रेसचा फुटीर गट आणि राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्ष यांनी मिळून स्थापन केलेल्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून लुर्दीस बाप्तिस्ता यांनी राजभवनवर शपथ घेतली.
त्याआधी दोन वेळा आमदार म्हणून विधानसभेचा अनुभव घेतलेले राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाचे नेते भास्कर नाईनकर हे राजकारण शांतपणे बघत होते. पुरुषोत्तम काणे आणि विल्सन डायस यांच्या भाऊगर्दीत आपल्याला सर्वोच्च पद भूषविण्याची संधी मिळणारच नाही हे बघून बाप्तिस्तांनी पक्ष सोडून विरोधकांशी हातमिळवणी करण्याचे पाऊल उचलले आणि अवघ्या काही दिवसांत ते मुख्यमंत्री बनलेही. हे राजकारण बघता बघता नाईनकरांच्या मनातही राजकीय महत्त्वाकांक्षा तयार होऊ लागली. राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षातील आपली स्थिती आणि राष्ट्रीय काँग्रेसमधील बाप्तिस्तांची अवस्था यात बरेच साम्य आहे असे नाईनकरांना वाटू लागले.
‘‘आपल्या पक्षात उमाकांत सावंत हे सध्या ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यानंतर ज्येष्ठतेत नवनाथ शेट्ये यांचा क्रमांक लागतो. मी आता तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो असलो तरी नेतृत्वाची संधी मिळण्याची शक्यता काही जवळपासही दिसत नाही...’’ नाईनकरांनी पक्षातील आपले विश्वासू आमदार सहकारी वामनराव उंब्रजकर आणि रोहन आगशीकर यांच्याशी एक दिवस मन मोकळे केले.
‘‘भास्कर, आधी आपल्या पक्षाला सत्ता मिळाली पाहिजे. नंतर नेतेपदाचे बघता येईल. गेल्या निवडणुकीत बहुमताच्या जवळ पोचूनही उमाकांत सावंत आणि नवनाथ शेट्ये ही जोडगोळी सरकार बनवू शकली नाही. त्या काणेंना बघ, आपल्याला हवे तेव्हा आमच्या पक्षात फूट पाडून स्वत:चे सरकार बनवतात ते.’’ उंब्रजकरांनी भास्कररावांच्या मनात बंडखोरीचा विचार पेरण्याचे काम हळूच केले.
‘‘आपण तसाच काही तरी वेगळा विचार केला पाहिजे. ’’ नाईनकरांचा राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्ष बाप्तिस्ता यांच्या आघाडी सरकारात सहभागी असला तरी उमाकांत सावंत आणि नवनाथ शेट्ये यांना मंत्रिपदे मिळाली होती. नाईनकरांचे पक्षात महत्व लक्षात घेतले गेले नव्हते. बहुजन समाजातून कष्टाने आपण नेतृत्व प्रस्थापित केले असले तरी सध्याच्या सरकारच्या प्रयोगात आपल्यावर मोठाच अन्याय झाला आहे, असा ग्रह त्यांच्या मनात ठाम बनू लागला.
तिकडे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सत्ता गमवावी लागल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांचे चालणारे राजकारण शांतपणे बघत राहण्याचे धोरण पुरुषोत्तम काणेंनी अवलंबिले हाेते. आपण एक साधा आमदार आहे असे सांगण्यात ते कमी करत नसत. परंतु दुसरे ज्येष्ठ नेते विल्सन डायस यांनी हाय खाल्ली नव्हती. काणेंनी एक, दोन नव्हे तर तीन वेळा मुख्यमंत्रिपद पटकावले. ‘आताच्या राजकीय धामधुमीत एखादा धमाका केला तर काहीही होऊ शकेल. आपले स्वप्नही पूर्ण करून घेता येईल...’ डायस यांच्या मनात हेच विचार अलिकडच्या दिवसांत घोळत असत. एक दिवस भास्कर नाईनकरांची अस्वस्थता त्यांच्या कानावर आली. लगेच त्यांचे डोळे चमकले.
‘‘तुझ्याकडे एकनिष्ठ असलेले किमान सहा तरी आमदार आहेत, मला ठाऊक आहे. सोड त्या तुझ्या पक्षाला, जो तुला काहीच देऊ शकत नाही. सहा आमदारांनिशी काँग्रेसमध्ये ये आणि थेट मुख्यमंत्री हो. पहिली दोन वर्षे तू, नंतरची दोन वर्षे हे पद मला दे.’’
विल्सन डायसचा प्रस्ताव ऐकताच नाईनकरांचे लगेचच ठरले. डायस मुख्यमंत्रिपद स्वत:कडे ठेवत नाहीत, तर ते आपल्याला ऑफर करताहेत, हे बघून त्यांनी लागलीच डायस यांचा हात आपल्या हातात घेतला. आपला पक्ष आपल्यावर अन्याय करतोय हा मनातील विचार आता अधिकच प्रबळ बनला. पुढील घटनाक्रम कसा असावा याबाबत दोघांनीही नेमकेपणाने चर्चा केली. नाईनकरांनी मुख्यमंत्रिपद घेताना डायस यांना उपमुख्यमंत्री बनवावे आणि दोन वर्षांनंतर पदांची अदलाबदल करून सरकार चालू ठेवावे यावरही दोघांचे एकमत झाले.
पुरुषोत्तम काणेंचे सरकार आल्याअाल्या उलथवल्यानंतर सिरील कॉन्सेसांव यांच्या मुख्यमंत्रिपदाचे सोळा दिवस झाले; त्याबरोबर लुर्दीस बाप्तिस्ता येऊन जेमतेम वर्ष होत आले होते. आता नाईनकरांनी आपला गट घेऊन राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षातून बाहेर पडत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील व्हावे आणि सरकार स्थापनेचा दावा करावा यावर नाईनकर आणि डायस यांनी शिक्कामोर्तब केले.
मुक्तीनंतरच्या तीन दशकांत राज्यात संपूर्ण राजकीय स्थैर्य होते. एवढ्या प्रदीर्घ काळात राज्याने केवळ तीन मुख्यमंत्री बघितले. एका पक्षाला लोकांनी निवडून दिले की त्या पक्षाचे सरकार पाच वर्षे चालवून घ्यायचे ही राजकीय नैतिकता अस्तित्वात होती. परंतु १९८९ वर्षाच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हे स्थिर आणि शिस्तबद्ध राजकीय चित्र उलटेपालटे झाले. आधी पुरुषोत्तम काणे, नंतर सिरील कॉन्सेसांव, मग लुर्दीस बाप्तिस्ता आणि आता भास्कर नाईनकर अशी नवनवीन मुख्यमंत्री बनण्याची मालिकाच सुरू झाली. आपल्या गटासह पक्ष सोडा आणि प्रतिस्पर्ध्याच्या सहाय्याने सरकार बनवून मुख्यमंत्रिपद पटकावा असा नवीन अध्याय राजकारणात लिहिला जाऊ लागला.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना भास्कर नाईनकरांच्या चेहऱ्यावर आनंद होता, परंतु तो ओसंडून वाहात नव्हता, ते सावध हसू होते. आपल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असलेल्या विल्सन डायस यांची नजर मुख्यमंत्रिपदावरच आहे, हे त्यांना विसरून चालणार नव्हते.
..............
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे संपादक आहेत.)
......................
(या कथेतील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक असून वास्तवाशी त्यांचा कोणताही संबंध नाही.)