बायोपिक : सामाजिक भान ठेवावे

रुपेरी पडदा

Story: विद्या नाईक होर्णेकर |
18th August 2018, 04:09 pm
बायोपिक : सामाजिक भान ठेवावे


--
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा प्रवास, या प्रवासात विविध विषय हाताळले गेले. त्यामुळे कधी तरी विषयांची वानवा चित्रपटसृष्टीला जाणवणार हे निश्चितच होते. मात्र, ती वेळ केवळ शंभर वर्षांच्या प्रवासानंतर येईल, असे वाटले नव्हते. कारण जग जसे पुढे जात आहे, विविध विषयांची निर्मिती आपसूकच घडत आहे. समाजात घडणाऱ्या घटना, बदल हे सगळे विषय हाताळण्याजोगे असतात. मात्र, प्रादेशिक चित्रपट सोडले तर हिंदी चित्रपटांमध्ये असे विषय अपवादात्मकच हाताळले जातात. कारण हिंदी चित्रपट नेहमीच ‘हटके’ करण्याच्या प्रयत्नात तोच तोच ‘मसाला’ विभिन्न पाककृतीत वापरत असल्याचे दिसून आले आहे. त्यातही हिंदी चित्रपटसृष्टीने काही संवेदनशील विषय हाताळलेच तर त्याला समांतर चित्रपटांचा टॅग लावला जातो. त्यामुळे मुख्य प्रवाहाचे चित्रपट हे मारधाड, प्रेमाचा अतिरेक, संगीत आणि नृत्याच्या पलीकडे क्वचितच जात असल्याचे पहावयास मिळते.
हिंदी चित्रपटात जर एक फॉर्म्युला सुपरहिट ठरला तर त्यावर अनेक चित्रपटांची निर्मिती होत असते. त्यामुळे कधी अॅक्शन ड्रामा तर कधी पिरियोडिक, कधी फॅमिली मुव्ही तर कधी बायोपिक असे सत्र हिंदी चित्रपटास सुरु असल्याचे पहावयास मिळते. सध्या पुन्हा एकदा बायोपिकची लाट आली असून, ही लाट काही दिवसांपूर्वी केवळ खेळाडूंवर सीमित होती. परंतु, ‘संजू’ च्या यशाने आता ही लाट कलाकारांच्या दिशेने वळली आहे. आता तर या लाटेने आपली दिशा राजकारणाकडे वळवली आहे.
राजकारण व चित्रपट यांचा संबंध तसा फार जुना आहे. त्यात हिंदी चित्रपटांमध्ये तर पोलिस व राजकीय नेते यांना जणू काही पर्यायच असत नाही. त्यांच्या केवळ भूमिका बदलतात, कधी त्या सकारात्मक असतात तर कधी नकारात्मक. परंतु, या भूमिकांची मर्यादा ठरलेली असते. ‘बायोपिक’ म्हटले म्हणजे संपूर्ण चित्रपटच त्यांच्यावर बेतलेला असतो. त्यामुळे सदर चित्रपट प्रेक्षकांपर्यत कुठला संदेश पोहोचवतो हे पाहणे गरजेचे ठरते. सध्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा बायोपिक तयार होतो न होतो तोच आता ‘अम्मा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री, अभिनेत्री आणि नृत्यांगना जयललितांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या अधिकृतरित्या ट्विटर अकाऊंटद्वारे दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तामिळ चित्रपट निर्माते विजय हे करणार असून हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा ३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचेही सांगितले जात आहे. चित्रपट २४ फेब्रुवारी २०१९ म्हणजेच जयललिता यांच्या जयंतीला प्रदर्शित करण्याचे निर्मात्यांनी ठरवले आहे. जयललिता यांचा चाहतावर्ग पाहता हे कधी न कधी तर होणारच होते.
राजकारण्यांवर चित्रपट होता कामा नयेत अशातला भाग नसून, त्याचा अतिरेक होऊ नये असे वाटते. कारण निवडून येणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्यावर जनतेचा विश्वास असतो. मात्र त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवण्याचे कसब काही मोजक्याच नेत्यांना जमते. हे नेते स्वत:पूर्वी त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा विचार करत असतात. स्वार्थ साधणाऱ्यांची मात्र, या क्षेत्रात अगदी लयलूट झालेली असते. त्यामुळे आजवर चित्रपटांमध्येही जी राजकीय पात्रे हाताळली गेली ती स्वार्थाने ओतप्रोत भरलेलीच पहावयास मिळाली. क्वचितच एखादा ‘स्वच्छ’ प्रतिमेचा नेता चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता जर संपूर्ण चित्रपट राजकीय नेत्यांवर काढले जाऊ लागले, तर केवळ चित्रपट चालावा म्हणून, वा राजकीय कृपादृष्टी रहावी म्हणून अनेक निर्माते राजकारण्यांची ‘उत्तम’ बाजूच प्रेक्षकांसमोर आणण्याचा अट्टाहास करतील इतके निश्चित. काही बाबतीत प्रेक्षकांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे चित्रपट म्हणजे निवडणूक प्रचारांचे एक उत्तम साधनही ठरू शकतील. कारण अशा स्वरुपाच्या चित्रपटातून सदर राजकीय नेत्यासोबत त्याच्या पक्षाची तत्त्वे, कार्य यावरही भर दिला जाणार. त्यातही भारतीय जनता ही भावूक असल्यामुळे एखाद्या गोष्टीचा प्रभाव अल्पावधी साठी का होईना तिच्यावर पडतोच पडतो. त्यात चित्रपटासारखे प्रभावी माध्यम तर अशा अनेक गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरते, ज्या जनतेपर्यंत आजतागायत पोहोचलेल्या नसतात. त्यामुळे प्रेक्षकांची दशा व दिशा बदलण्याचे सामर्थ्यही चित्रपटांमध्ये आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरता नये. उद्या याच संधीचा लाभ घेत काही ‘अतिशहाणे’ राजकीय नेते, निर्माता - दिग्दर्शकांवर दबाव आणून आपलाही बायोपिक व्हावा म्हणून प्रयत्न करू शकतात. ज्याद्वारे ते आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्नही करू शकतात. ‘भातावरुन शीताची परीक्षा करू नये’ असे म्हणतात. हे जरी खरे असले तरी आपल्या दैनंदिन ‘जर’ व ‘तर’ ला पर्याय नाही, हेही तितकेच खरे आहे.
भारतीय राजकारणात खरोखरच काही मंडळी इतकी चांगली आहेत की त्यांचा आदर्श भविष्यात या क्षेत्रात कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्यांनी घ्यावा. मात्र त्यांच्यासोबत जर चुकीच्या नेत्यांचा आदर्शही प्रेक्षकांपर्यंत पोहोचला तर ते समाजहिताचे नक्कीच नसेल. त्यामुळे बायोपिक करताना व अशा स्वरुपाचे विषय हाताळताना, निर्मात्यांनी सामाजिक भान ठेवले म्हणजे मिळवली.
(लेखिका नामवंत सिनेसमीक्षक आहेत.)