राजधर्मनिष्ठ राज्यकर्ता

Story: विशेष संपादकीय |
17th August 2018, 06:00 am

राज्यकर्त्याने राजधर्माचे पालन करावे; राजा किंवा राज्यकर्ता जात, धर्म, समुदाय अशा कोणत्याही आधारावर भेदभाव करू शकत नाही, अशी स्पष्ट सूचना आडपडदा न ठेवता आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याला देणारा राष्ट्रनेता भारताने गमावला आहे. दहा वेळा लोकसभेवर आणि दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेलेल्या अटलबिहारी वाजपेयी या व्यक्तीची उपस्थिती अर्धशतकाहून अधिक काळ देशाच्या राजकीय व्यासपीठावर ठळकपणे जाणवत राहिली. राजकारणातील, राजनैतिक व्यवहारांतील चांगली उदाहरणे देताना अटलबिहारी वाजपेयी हे नाव यापुढेही वरचेवर घेतले जाईल. राजकीय कारकिर्दीची सुरुवात शून्यातून करून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत मजल मारणाऱ्या या नेत्याने पदाचा मानमरातब मिरविण्याऐवजी कायमच पदाची शान जपली. आधी तेरा दिवस, नंतर तेरा महिने आणि तिसऱ्या प्रयत्नात पाच वर्षांच्या पूर्ण कालावधीचे सरकार चालविणारे पंतप्रधान ठरलेल्या या व्यक्तीने आपण जर प्रयत्न आणि निष्ठा नाही सोडली, तर राजकारणातही किती उंची गाठता येते हे दाखवून दिले.

समविचारी व्यक्तीशी जर सहजसुंदर मैत्री होऊ शकते तर प्रतिस्पर्धी विचारधारा मानणाऱ्यांशीही प्रयत्नपूर्वक मैत्री करता येते हे वाजपेयी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातून सिद्ध केले. अजातशत्रू असलेल्या वाजपेयींशी राजकीय मतभेद अनेकांचे होते, परंतु वैयक्तिक शत्रुत्व कोणाशीही नव्हते. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल जसा त्यांना आदर होता, तसे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी त्यांनी मैत्रीचे बंध जोडले होते. कविमनाच्या वाजपेयींनी आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, पुढे जनसंघाची आणि १९८० नंतर भारतीय जनता पक्षाची बांधणी करताना राजकीय चातुर्य तसेच संघटनकौशल्य दाखविले. एकीकडे मनाचा हळवेपणा आणि संवेदनशीलता जपताना दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या अणुचाचण्या पोखरण येथे करण्याचा ठामपणा दाखविला. एरवी शत्रूलाही आपले मानणाऱ्या वाजपेयींनी पाकिस्तानने कारगिलवरील चढाईची आगळीक केली तेव्हा त्यांना धडा शिकविण्याचे आदेश लष्कराला दिले. राज्यकर्त्याने राजधर्म पाळणे सर्वांत महत्त्वाचे असते याची जाणीव कायम ठेवणारा हा राजा जनतेच्या गाढ विश्वासाला आणि निर्व्याज प्रेमाला पात्र ठरला होता.