एका राजकीय युगाची समाप्ती

असा सर्वसमावेशक आणि द्रष्टा नेता क्वचितच जन्माला येतो. नि:स्वार्थी आणि पारदर्शक व्यक्तिमत्त्व असलेल्या अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाने देशाच्या राजकारणातील सभ्यतेचे एक युग समाप्त झाले आहे.

Story: अग्रलेख |
17th August 2018, 06:00 am

अटलबिहारी वाजपेयी ही काही झंझावाती व्यक्ती नव्हती, परंतु ते सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा जसा होता तसाच ठामपणा आणि कणखरपणाही होता. मित्राच्या मैत्रीसाठी जागणारा हा दिलदार माणूस प्रतिस्पर्ध्याच्या हिताचाही विचार तेवढ्याच सहजतेने करीत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक कार्यासाठी जसे त्यांनी रक्त आटवले तसेच पंतप्रधान बनल्यानंतर आणि त्याआधीही राष्ट्रउभारणीसाठी स्वत:ला वाहून घेतले. भारतीय जनता पक्षासारख्या उजव्या विचारधारेचा मानल्या गेलेल्या राजकीय पक्षाचे नेतृत्व करतानाही उदारमतवादी भूमिका घेऊन जागतिक नेत्यांचा आदर कमविला. म्हणूनच तर संघर्षपूर्ण आयुष्य जगूनही अखेरपर्यंत त्यांच्यातील हळवा कवी जागा राहिला, संवेदनशील माणूस जिवंत राहिला. वयोमान आणि प्रकृतिअस्वास्थ्य यामुळे गेले दशकभर वाजपेयींना सार्वजनिक जीवनापासून दूर ​राहावे लागले. परंतु त्याआधीच त्यांनी आपल्या आरोग्याच्या मर्यादा ओळखून पक्षाचे नेतेपद लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे सोपवित सक्रिय राजकारणातून निवृत्ती स्वीकारली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांत त्यांची प्रकृती ढासळत राहिली आणि अखेरच्या टप्प्यात चिंताजनक बनली. ‘मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ, लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?’ अशा काव्यपंक्ती एेन उमेदीत लिहून ठेवणारा हा उमदा कवी जीवनभर अविवाहित राहिला, परंतु जीवनाच्या प्रत्येक अंगाचे रसग्रहण करण्यात कमी नाही पडला. सार्वजनिक जीवनात अतिथ्यशीलता आणि त्याचबरोबर चारित्र्य अतिशय महत्त्वाचे असते, याचा तर अटलबिहारी वाजपेयी हे चालताबोलता आदर्श बनले.

आपल्या विचारसरणीशी साम्य नसलेल्या राजकीय घटकांना सोबत घेऊन राष्ट्रउभारणीच्या कामात झोकून द्यायचे असेल तर संयम आणि सोशिकता किती असावी लागते आणि विविध अडचणींतून मार्ग काढत पुढे कसे जाता येते याचे उदाहरण आपल्या कार्यशैलीतून घालून देणारा हा अतुलनीय नेता हाेता. १९९६ मध्ये त्यांना पहिल्याप्रथम अल्पमतातील सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तेव्हा स्वबळावर बहुमत नाही आ​णि पाठिंब्यासाठी मित्रपक्ष नाहीत अशा परिस्थितीत केवळ तेरा दिवस त्यांचे सरकार टिकले. तेव्हाच आपल्या पक्षाच्या मर्यादा लक्षात घेऊन राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून राजकीय आघाडी बांधण्याची मोहीम वाजपेयींना हाती घेतली आणि त्यातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आकार घेतला. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले तरी त्यांनी आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊनच केंद्रात सरकार बनविले. या राजकारणाचे बीज वाजपेयींनी रोवले होते. ‘जीवन को शत-शत आहुति में, जलना होगा, गलना होगा; कदम मिलाकर चलना होगा’ हे आपणच लिहिलेले तत्त्व त्यांनी कसोशीने पाळले. म्हणून भारतात आघाडीचे राजकारण रुळले आणि देशाला राजकीय स्थैर्य लाभले. यामुळेच गेल्या काही दशकांत आर्थिक, औद्योगिक आणि इतर आघाड्यांवर देशाने सर्वांगीण प्रगतीची झेप घेतली. वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पोखरण येथील वाळवंटात अणुचाचण्या घेण्यात आल्या. १९९९ च्या सुरुवातीला दिल्ली-लाहोर बससेवा सुरू करून पाकिस्तानशी मैत्रीची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. परंतु कारगील क्षेत्रातील घुसखोरी हवी तेवढ्या गांभीर्याने घेत त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी दु:साहसाचा निर्णायक पराभव केला. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचे स्पष्ट करून त्यांनी अमेरिका आणि चीनच्या विरोधालाही जुमानले नाही. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनताच त्यांनी देशभरात हमरस्त्यांचा चतुष्कोन प्रकल्प आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर लक्ष दिले, त्याचबराेबर आर्थिक सुधारणांच्या प्रक्रियेला वेग दिला.

‘हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा’असा निश्चय आपल्या कवितेतून व्यक्त करणाऱ्या वाजपेयींना २००४ मध्ये मात्र पराभव स्वीकारून आपल्या राजकीय कारकिर्दीची अखेर करावी लागली. तेव्हाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळेल असा सार्वत्रिक अंदाज असताना ‘इंडिया शायनिंग’ प्रचारमोहीम भाजपच्या अंगलट आली आणि वाजपेयी सरकारला पायउतार व्हावे लागले. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर जागतिक नेत्यांचा सर्वाधिक आदर कमविणारा नेता असे त्यांचे वर्णन करावे लागेल. देशातही ममता बॅनर्जी, जयललिता, नितीशकुमार, बाळासाहेब ठाकरे, फारुख अब्दुल्ला, करुणानिधी असे विविध दिशांना तोंड असलेल्या नेत्यांना आपल्या आघाडीशी जाेडून घेण्याचे त्यांचे कसब अपवादात्मक ठरले. असा सर्वसमावेशक आणि द्रष्टा नेता क्वचितच जन्माला येतो. नि:स्वार्थी आणि पारदर्शक व्यक्तिमत्त्व असलेल्या अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाने देशाच्या राजकारणातील सभ्यतेचे एक युग समाप्त झाले आहे.