आजीबाईच्या बटव्याचे पुनरागमन

जुन्या माहितीचे संकलन करून येत्या काही वर्षात बाळ बाळंतीणीसाठी आजीबाईंच्या बटव्यात पूर्वी असलेल्या अनेक औषधांचा वापर पुन्हा सुरु होण्यासाठी लक्षणे आहेत. आजीबाईच्या बटव्याचे ते पुनरागमन ठरेल.

Story: विज्ञान विहार | डॉ. प्रमोद पाठक |
17th August 2018, 06:00 am

भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत घराघरात पर्यायी औषधी व्यवस्था होती. अनेक आजार घरच्या आजीबाई त्यांना माहिती असलेल्या पारंपरिक औषधी किंवा जडीबुटींनी बरे करीत. त्यांच्या बटव्यात अनेक औषधी असत. या बटव्यातील वनस्पती, औषधींचा वापर विशेषत: बाळ बाळंतीण यांच्यासाठी करण्यात येई. स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक ठिकाणी अॅलोपॅथिची वैद्यकीय महाविद्यालये निघाली. डॉक्टरांची संख्या वाढली आणि औषधे बाटल्या, टॅब्लेट अशा प्रकारांतून मिळायला लागल्याने काम सुकर झाले. अनेक व्याधींवर अॅलोपॅथिची औषधे पारंपरिक आयुर्वेदाच्या औषधींपेक्षा अधिक परिणामकारक असतात असेही अनुभवाला येऊ लागले. विशेषत: इंजेक्शनमधून औषधी देण्यामुळे औषधांचा परिणाम दिसू लागला. अगदी खेड्यांमधून डॉक्टरने सुई द्यावी असे सुचविणारे ग्रामीण रुग्ण होते. जो सुई देत नाही तो चांगला डॉक्टर नाही असे समजण्यापर्यंत लोकांची मानसिकता झाली. काही काळाने अॅलोपॅथिच्या औषधाचे दुष्परिणाम दिसू लागले. एक व्याधी बरी करायला जावी तर दुसरी व्याधी मूळ धरू लागली. त्यानंतर साहजिकच लोकांचा ओढा पर्यायी उपचार पद्धतींकडे वळू लागला.

आजीबाईंच्या बटव्याकडे दुर्लक्ष

सुमारे साठ सत्तर वर्षांपूर्वी आजीबाईंच्या बटव्यातील औषधी अशा विषयावर पुस्तके असत. तोवर ज्ञात असलेल्या घरगुती उपायांची चारण, काढे घरच्याघरी तयार करण्याच्या पद्धती त्यात दिलेल्या असत. पण डॉक्टर मंडळींचे प्रस्थ वाढले. मुलाबाळांना तडक डॉक्टरकडे नेऊन औषधोपचार करवून घेण्याकडे ओढा वाढला आणि नव्या पिढीतील सुनांनी आपल्या सासवांकडून त्यांच्या नवऱ्यांना लहानपणी टाळले. त्यानंतरच्या सुनांच्या पिढीला म्हणजे आज २५ ते ३० वर्षांच्या महिलांना, ज्यांना आठ वर्षाखालील मुले असू शकतात, त्यांना तर घरगुती उपाय करण्याची माहितीच नसते. आजीबाईचा बटवा या तरुण पिढीच्या स्मरणातून पुसला गेला आहे. आजकाल तर उठसूट डॉक्टरच नव्हे तर तडक विशेषज्ञां(स्पेशालिस्ट)कडेच बाळांना आणि लहान मुलांना नेले जाते.

आयुर्वेदाचा उपयोग

जसजसे अॅलोपॅथिच्या औषधांचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागले. तसतसे लोकांचे लक्ष आयुर्वेद, मुनानी इ. पारंपरिक औषधोपचारांकडे वळू लागले. भारतात वैद्यकीय महाविद्यालयांपाठोपाठ मोठ्या प्रमाणावर आधुनिक शिक्षण प्रणालीच्या आधारे शिक्षण देणारी आयुर्वेद महाविद्यालये निघू लागली. गुरुकुल पद्धतीने पारंपरिक औषधांना शिकविणारी शिक्षण प्रणाली मागे पडून आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षणात अनेक इतर, ज्याला आधुनिक म्हणता येईल असे विषय अंतर्भूत झाले. आधुनिक रसायन विज्ञान आणि पृथक्करण प्रक्रियांचा वापर करण्याच्या पद्धतीही आयुर्वेदात अंतर्भूत झाल्या. आजचा आयुर्वेदात संशोधन करणारा वैद्य, नव्हे डॉक्टर, औषधी वनस्पतींमध्ये असलेल्या वनस्पतींचे रासायनिक पृथक्करण करतो.

असे जरी असले तरी नव्या पिढीतील आयुर्वेद संशोधकांमध्ये आता पारंपरिक औषधांचा नव्या पद्धतींद्वारे संशोधन करण्याचा कल दिसून येतो आहे.पूर्वापार घरगुती स्तरावर जी औषधे दिली जात त्याचा अभ्यास करून त्यात प्रमाणीकरण (standardization) करून ती औषधे निर्माण करण्याकडे कल होतो आहे.

बाळबाळंतीणीची औषधे

भारतात बाळबाळंतीणीला देण्यासाठी अनेक पारंपरिक औषधे, घुट्या, काढे वापरतात. अजूनही आहेत. उ.प्र.मधील चित्रकूट परिसरातील काही खेड्यांमधून अशा पारंपरिक औषधांचा शोध व सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक जाती जमातीच्या काही वेगळ्या औषधी असतात असे माहिती असल्याने त्यांची माहिती गोळा करताना त्यानुसार माहितीचे वर्गीकरण करण्यात आले. या खेड्यांमध्ये उच्च जातींचे , बहुजन समाज, दलीत आणि मुस्लिम असे विभाजन आहे. त्यानुसार त्या वस्त्यांमधून राहणाऱ्या महिलांकडून त्या पारंपरिक औषधांची माहिती काढण्यात आली. त्याचे वय २८ ते ७१ या दरम्यान होते, एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट उजेडात आली, ती म्हणजे या सर्व महिलांना बाळंतपणानंतर घेण्याच्या बाळबाळंतीणीच्या काळजी व सुश्रुषेची चांगली माहिती होती. या महिलांमध्ये जशा शिकलेल्या महिला होत्या, तशाच अशिक्षित महिलाही होत्या.

या महिलांकडून योग्य प्रकारे माहिती काढण्यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली. त्यात महिलेची व कुटुंबाची माहिती तर होतीच पण तीला व्यक्तिगतरित्या माहिती असलेली औषधे, त्याचे काढे, चारण इ. तयार करण्याच्या पद्धती, औषधी वनस्पती, त्या कुठून आणत होत्या. याला जोडून प्रश्न देण्यात आले होते. त्याचबरोबर स्थानिक स्तरावर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, राज्य प्रशासनाच्या आरोग्यविषयक योजना यांची कितपत माहिती आहे याचेही सर्वेक्षण केले गेले. या सर्व खेड्यांमधून बाळबाळंतीणीला वेगळ्या खोलीत ठेवण्याची प्रथा असून त्या खोलीत जळणाऱ्या गौऱ्यांवर ओव्याची चिमूट टाकून धूर करण्याचा प्रघात आहे. आधुनिक वैद्यकानुसार या धूरात जंतू संसर्ग विरोधक आणि फुफ्फुसे साफ करणारी औषधी द्रव्ये असतात. बाळंतीणीसाठी देशी तूप, खोबरे, बदाम इ.चा खाण्यात समावेश केला जातो. त्याचे कारण म्हणजे बाळासाठी आईला भरपूर दूध यावे म्हणून या पदार्थांना दिले जाते. कोळ नावाचे औषध दूध जास्त येण्यासाठी पहिल्या ४ ते ५ दिवसांत आईला दिले जाते. आले, हिंग इ. नेहमीच्या वापरातील वस्तू या पचनक्रिया वाढविण्यासाठी होतो ही सुद्धा माहिती त्यांना होती. अनेक प्रकारच्या भाज्या या दरम्यान दिल्या जातात. त्यातून औषधी द्रव्ये नैसर्गिकरीत्या आईच्या व बाळाच्या पोटात जातात. त्याच प्रमाणे काळे उडीद, वांगी वापरू नयेत असेही पथ्य पाळले जाते. त्या त्या सर्व माहितीचे संकलन करून येत्या काही वर्षात बाळ बाळंतीणीसाठी आजीबाईंच्या बटव्यात पूर्वी असलेल्या अनेक औषधांचा वापर पुन्हा सुरु होण्यासाठी लक्षणे आहेत. आजीबाईच्या बटव्याचे ते पुनरागमन ठरेल.