पत्नीचा खून, पतीला गोव्यात अटक

सादळगा पोलिस हद्दीतील प्रकरण, इचलकरंजी येथील दिनेश पाटील याला अटक


12th August 2018, 04:41 pm
पत्नीचा खून, पतीला गोव्यात अटक

प्रतिनिधी । गोवन वार्ता


पणजी : सादळगा कर्नाटक पोलिस स्थानकाच्या हद्दीत पत्नीचा खून करून गोव्यात आलेला संशयित दिनेश गणपती पाटील ( इचलकरंजी, कोल्हापूर) याला पणजी पोलिसांनी रविवारी सायंकाळी मिरामार येथून ताब्यात घेऊन अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताला कर्नाटक पोलिस गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.


पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दिनेश गणपती पाटील याने शनिवारी पत्नी दिशा पाटील हिचा खून केला. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या सादळगा पोलिस स्थानकाच्या हद्दीत फेकला. दरम्यान सादळगा- कर्नाटक पोलिसांना तिचा मृतदेह मिळाला. त्यानंतर पोलिसांनी दिशाच्या मृत्यू बाबत चौकशी सुरू केली. तिचा खून करण्यात आल्याने पोलिसांनी संशयित दिनेश याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि २०१ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या चौकशीवेळी संबंधित संशयित गोव्यात असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली. त्यानंतर सादळगा - कर्नाटक पोलिसांनी पणजी पोलिसांशी संपर्क साधून संशयित दिनेश याची माहिती दिली. या माहितीनुसार पणजी पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक उत्क्रांतराव देसाई, पोलिस निरीक्षक साहिल वारंग, पोलिस कॉन्स्टेबल साईश उसकईकर, दीपराज सातोर्डेकर आणि पोलिस पथकाने पणजीत संशयितांची शोध घेतला.या वेळी संशयित मिरामार परिसरात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन स्थानकात आणला. तसेच याबाबत पणजी पोलिसानी सादळगा पोलिसांना माहिती दिली.


कर्नाटक पोलिस गोव्यात दाखल झाल्यानंतर संशयित दिनेश पाटील याला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

हेही वाचा