भाजपच्या पराभवास जबाबदार ‘चौकडी’ने पदत्याग करणे योग्य

युवा नेते भावेश जांबावलीकर यांचा फेसबुकवरून प्रहार


16th July 2018, 03:29 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : गत विधानसभा निवडणुकीत भाजपची २१ वरून १३ जागांवर झालेल्या घसरणीला पक्षातील चार नेते जबाबदार आहेत. पक्षाच्या पराभवाला जबाबदार असलेल्या या ‘चौकडी’ने तत्काळ पक्षत्याग करावा, अशी मागणी फेसबुक पोस्टद्वारे करीत भाजपचे युवा नेते भावेश जांबावलीकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या पक्ष संघटनेत चर्चेचा विषय बनली आहे. 

भाजपचे दक्षिण गोव्यातील तडफदार युवा नेतृत्व म्हणून भावेश जांबावलीकर यांची ओळख आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या जांबावलीकर यांच्याकडे सध्या महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाच्या सह 

प्रभारीपदाची जबाबदारी आहे. अपार मेहनत आणि अविरत प्रयत्नांतून राज्यात भाजप संघटना बांधण्यात आली आहे. पण गत विधानसभा निवडणुकीवेळी संघटनेतील ढिसाळपणा स्पष्ट झाला, असे त्यांनी फेसबुकवर टाकलेल्या कोकणी भाषेतील पोस्टमध्ये म्हटले आहे. भाजपच्या पराभवाला पक्ष संघटनेतील ‘चौकड’ जबाबदार आहे. त्यांच्यामुळे पक्षाला वाईट दिवस येऊ शकतात. त्यामुळे या ‘चौकडी’ला स्वाभिमान असेल, तर त्यांनी पदत्याग करून तत्काळ बाजूला व्हावे, असे आवाहन जांबावलीकर यांनी केले आहे. पण या ‘चौकडी’मध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. 

पक्ष संघटनेला न्याय देऊ शकत नसलेल्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: बाजूला होऊन अन्य प्रामाणिक कार्यकर्त्यांना वाट मोकळी करून द्यावी. पक्षासाठी आपले जीवन वेचलेले अनेक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. परंतु त्यांना कुणीच विचारत नाही. केवळ पदे अडवून बसण्यात काय अर्थ आहे, असा सवाल करीत पदांवर राहायचे असेल तर काम करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. आपले कुणाशीही वैर नाही किंवा कुणाहीबाबत आपल्या मनात आकस नाही. पण पक्ष संघटना बळकट व्हायची असेल, तर वेळोवेळी बदल होणे अपरिहार्य आहे. बदल केल्याशिवाय निश्चित ध्येय साध्य होणे कठीण आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करून चालणार नाही. केवळ नाममात्र बैठका घेऊन त्याचे फोटो आणि अहवाल तयार करून केंद्राला पाठविणे याचा अर्थ पक्ष संघटना चालविणे असा होत नाही. राज्यातील भाजपमधील सावळ्या गोंधळाबाबत कुणीतरी आवाज काढण्याची गरज होती आणि आपण त्याला वाट मोकळी करून दिली. आता अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाला घ्यायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रदेश युवा संघटनेची नेमणूक करताना आपल्याला अजिबात विश्वासात घेण्यात आले नाही. आघाडी सरकारबाबत आपली काहीच हरकत नाही. परंतु त्यासाठी पक्ष संघटनेबाबत तडजोड करणे उचित ठरणार नाही, असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, भावेश जांबावलीकर यांनी टाकलेल्या या पोस्टला ‘फेसबुक’वर मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या धाडसाचे भाजप कार्यकर्त्यांकडून कौतुक केले जात आहे.

पक्षाचे माजी संघटनमंत्री सतीश धोंड यांना पुन्हा गोव्यात आणावे, यासाठी भावेश जांबावलीकर यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवरून चळवळ सुरू केली होती. या चळवळीला पक्षातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला होता. सतीश धोंड यांना गोव्याचा सखोल अभ्यास आहे. सध्याचे संघटनमंत्री विजय पुराणिक हे देखील उत्तम संघटक आहेत. आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. पुराणिक यांच्याकडे महाराष्ट्र आणि गोव्याची जबाबदारी आहे. पण गोव्यासाठी पूर्णवेळ संघटनमंत्र्यांची नितांत गरज आहे, असे जांबावलीकर ‘गोवन वार्ता’शी बोलताना म्हणाले.

कारवाईची पर्वा नाही : जांबावलीकर

संघटनात्मक बाबींबाबत अशा पद्धतीने जाहीर वाच्यता करणे शिस्तभंग ठरते, याची जाणीव आपल्याला आहे. परंतु या गोष्टी डोळ्यांसमोर घडत असताना त्याबाबत मौन बाळगणे आपल्याला सहन झाले नाही. पक्षातील या गोष्टी प्रकट करण्यासाठी आपणास योग्य व्यासपीठ मिळाले नसल्याने आपण त्या सोशल मीडियाद्वारे मांडल्या, असा युक्तिवादही भावेश जांबावलीकर यांनी केला आहे. आपण काहीही चूक केलेली नाही. सत्य बोललो म्हणून आपल्यावर कारवाई करायचीच ठरवली तर आपले पद काढून घेतले जाईल. पण त्याची आपल्याला पर्वा नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.