कुंकळ्ळीचा इतिहास पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू

खासदार सावईकरांची हमी


16th July 2018, 03:28 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता

कुंकळ्ळी : इतिहास हा भावी पिढीसाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम मार्गदर्शक असतो. त्यामुळे तो त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचला पाहिजे. यासाठी कुंकळ्ळीचा इतिहास पाठ्य पुस्तकांद्वारे भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्रीय स्तरावरून प्रयत्न करू, अशी हमी खासदार नरेंद्र सावईकर यांनी रविवारी दिली.

कुंकळ्ळी येथील हुतात्मा स्मारक समिती आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १६ महानायकांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस, नगराध्यक्ष लेविता मास्कारेन्हास, उपनगराध्यक्ष शशांक देसाई, मुख्याधिकारी शंकर गावकर, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन्स व नगरसेवक उपस्थित होते. 

सावईकर म्हणाले, चांगले प्रकल्प आल्याशिवाय कोणत्याही प्रदेशाचा विकास होत नाही. त्यामुळेच राज्य सरकार गोव्यात विविध प्रकल्प साकारण्याच्या विचारात आहे. पण हल्ली शैक्षणिक प्रकल्पांना लोकांकडून विरोध होत आहे. जनतेने या प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

आमदार क्लाफासियो डायस यांनीही हुतात्मा स्मारक समितीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत, कुंकळ्ळीचा इतिहास पाठ्य पुस्तकात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात फादर डॉ. अॅलन तावारीस, शांबा देसाई व पत्रकार रमेश नाईक राऊत यांचा खासदार सावईकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दहावी व अकरावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.