सुर्लातील समस्या विधानसभेत मांडणार

प्रतापसिंह राणेंची ग्वाही : गावाला अचानक भेट, परिस्थितीचा आढावा


16th July 2018, 07:17 pm
सुर्लातील समस्या विधानसभेत मांडणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई, नगरगाव :
सत्तरी तालुक्यातील सुर्ला गावामध्ये दारू विक्री दुकाने बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली. त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रतापसिंग राणे यांनी रविवारी अचानक सुर्ला गावाला भेट दिली.
यावेळी नागरिकांशी केलेल्या चर्चेचा तपशील विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
मात्र प्रतापसिंग राणे या गावात येत असल्याची कुणकुण लागताच दारू विक्री दुकानदारांनी या भागातील पर्यटकांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. या भागात तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनीही याबाबत कडक कारवाई करण्याचे नाटक करत असल्याचा आरोप सुर्ला भागातील नागरिकांनी केला.
प्रतापसिंग राणे यांनी ग्रामस्थांशी गावात होणाऱ्या दारू ​विक्रीमुळे निर्माण झालेल्या समस्येबाबत नागरिकांशी चर्चा केली. भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही व त्यांचे जीवन सुर​क्षित राहील. याची पूर्ण खबरदारी घेऊन समस्या निवारण करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी गावातील नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभेत मांडल्यानंतर सरकार यावर निश्चितच याेग्यती कारवाई करणार, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी नागरिकांनी राणे यांच्याकडे कर्नाटकच्या नागरिकांकडून हुल्लडबाजी केली जात असल्याो स्थानिक नागरिक त्रस्त बनले आहे. त्यामुळे गावातील शांतता भंग होऊन वातावरण बिघडत असल्याची तक्रार केली. यावर राणे यांनी ही दुर्भाग्यपूर्ण बाब असल्याची खंत व्यक्त केली. लवकरच यावर उपाय योजना करून सुला गावात शांतता राखण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही राणे यांनी दिली.
तत्पूर्वी देवस्थानच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका खास बैठकीत ग्रामस्थांनी दारू विक्री दुकाने बंद करण्याच्या आंदोलनाला चालना देण्यासाठी महत्त्वाची समिती गठित केली. या समितीच्या अध्यक्षपदी गणू गावकर यांची निवड करण्यात आली असून महिला अध्यक्षपदी गायत्री गावकर यांची निवड करण्यात आली आहे. गावातील नागरिकांनी एकजुटीच्या मार्गाने हाती घेतलेले आंदोलन जोपर्यंत दारू दुकाने बंद होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. याबाबत शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
फोटो -
सुर्ला गावातील नागरिकासोबत चर्चा करताना प्रतापसिंह राणे, सोबत पंच सभासद सुर्यकांत गावकर.