म्हापसा जनता हास्कूलमध्ये डेंग्यू, मलेरियावर जनजागृती


16th July 2018, 06:53 pm

 प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : पावसाळ्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यू सारख्या रोगांची लागण होते. नागरिकांनी वेळीच उपाययोजना केल्या नाही तर माणूस दगावण्याची भीती असते. आरोग्य केंद्रात़र्फे जागृती कार्यक्रम हाती घेऊन लोकांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले जाते, असे प्रतिपादन म्हापसा नागरी आरोग्य केंद्राच्या विस्तार अधिकारी डेजी विश्वास यांनी केले.
येथील जनता हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघाचा बैठकीत डेंग्यू व मलेरिया यासंबधी घ्यायची खबरदारी या विषयावर डेजी बोलत होत्या. यावेळी पालक शिक्षक संघ अध्यक्ष राजश्री मयेकर, उपाध्यक्ष तुकाराम शेमडकर, सदस्य नीता पेडणेकर, भारती सांबरेकर, अनिता पेडणेकर, सचिव श्रद्धा कामुलकर, मुख्याध्यापक रत्नकांत च्यातीम, उपमुख्याध्यापिका राजश्री भोगटे आदी होत्या.
पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे श्रीमती डेसी विश्वास यांनी निरसन केले.
या शाळेत शिक्षणाबरोबर चांगले संस्कार दिले जातात. आम्ही तळागाळातील मुले आदर्श नागरिक कशी बनतील यावर भर देतो, असे मुख्याध्यापक च्यातीम यांनी सांगितले.
सूत्रसंचालन मेघना साळगावकर यांनी केले. स्मिता नास्नोडकर यांनी परिचय करून दिला तर स्नेहा परब यांनी आभार मानले.