राष्ट्रीय खेळाद्वारे पेडण्यातून खेळाडू तयार करुया !

क्रीडामंत्री आजगावकर यांचे प्रतिपादन; सावळवाडा येथे इनडोअर स्टेडियमची पायाभरणी


15th July 2018, 02:21 am


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : राष्ट्रीय खेळ २०१९ साली मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला होणार असून त्या खेळाच्या निमित्ताने पेडणे तालुक्यातून खेळाडू तयार करुया. येत्या आठ महिन्यांच्या कालावधीत सावळवाडा-पेडणे येथे इनडोअर स्टेडियम तयार होईल. पालकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळातही प्राविण्य मिळवण्यासाठी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी येथे काढले.
सावळवाडा येथे ३७ कोटी रुपये खर्च करून बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियमच्या पायाभरणी कार्यक्रमात शनिवारी भूमिपूजन केल्यानंतर मंत्री आजगावकर बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, क्रीडा संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, क्रीडा सचिव जे. अशोक, ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस गुरुदत्त भक्ता, पेडणे नगराध्यक्ष श्रद्धा माशेलकर, उपनगराध्यक्ष प्रशांत गडेकर, जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर व रमेश सावळ, डॉ. वासुदेव देशप्रभू, रामा सावळ देसाई, माजी आमदार परशुराम कोटकर, पांडुरंग परब, कोरगाव सरपंच प्रमिला देसाई, पोरस्कडे सरपंच रोश फेर्नांडिस, वारखंड सरपंच प्रदीप कांबळी, विर्नोडा सरपंच भरत गावडे, मोपा सरपंच पल्लवी कांबळी, चांदेल सरपंच संतोष मळीक, वझरी सरपंच संगीता गावकर, हळर्ण सरपंच विशाल नाईक, धारगळ सरपंच वल्लभ वराडकर, इब्रामपूर सरपंच सोनाली पवार, अभियंते चिमुलकर आदी उपस्थित होते.
क्रीडा मंत्री आजगावकर यांनी राष्ट्रीय खेळ २०१९ नजरेसमोर जुन्या मैदानाच्या जागी बहुउद्देशीय इनडोअर क्रीडा प्रकल्प उभारून त्यात २४ विविध प्रकारच्या खेळांना प्राधान्य देण्यासाठी केवळ आठ महिन्यांत हा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे. या स्टेडियममध्ये हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, टेबल टेनिस या क्रीडा प्रकारांसाठी खास जागा, शिवाय चेंजिंग रूम, व्हीआयपी आसन व्यवस्था, पत्रकार कक्ष, प्रेक्षक आसन व्यवस्था अशा सुविधा असतील.क्रीडा मंत्री आजगावकर पुढे म्हणाले, सुपर डोके असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर असल्यामुळे राज्याचा चौफेर विकास होत आहे. देवाने राज्याच्या हितासाठी पर्रीकर यांचे आरोग्य तंदुरुस्त ठेवावे.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, भारतीय फुटबॉल संघ विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आतापासूनच गोमंतकीय खेळाडूंनी त्या दर्जाचे खेळाडू तयार करावेत. गावागावांत मैदानांची गरज असून सध्याची मैदाने दुरुस्त केली जाणार आहेत. त्यासाठी खासदार निधी उपलब्ध केला जाईल.
क्रीडा संचालक प्रभुदेसाई म्हणाले, पेडणेवासीयांची खूप वर्षांची मागणी पूर्ण होत आहे. या प्रकल्पात एकूण २४ खेळांना प्राधान्य दिले जाईल. इथल्या खेळाडूंना म्हापसा इनडोअर स्टेडियममध्ये जावे लागत होते. आता सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यावेळी क्रीडा सचिव जे. अशोक व नगराध्यक्ष माशेलकर यांची भाषणे झाली. स्वागत व सूत्रसंचालन कुलदीप कामत यांनी केले. सदानंद सावळ देसाई यांनी आभार मानले.