नामदार चषक पावसाळी क्रिकेट स्पर्धा आजपासून

होंडा - सत्तरी येथील नारायणनगर मैदानावर आयोजन; यंदा गोमंतकीय खेळाडूंना संधी


15th July 2018, 02:18 am



प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई :  होंडा - सत्तरी येथे गेल्या दोन वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेली नामदार चषक पावसाळी क्रिकेट स्पर्धा रविवार दि. १५ जुलैपासून होंडा येथील नारायणनगर मैदानावर खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून यंदाही तिसऱ्या वर्षी अशाच प्रकारची पावसाळी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मात्र यावेळी गोमंतकीय खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात राज्यातील सर्व नगरपालिका, पंचायत स्तरावर सामने होणार आहेत.
या समारंभास स्थानिक सरपंच आत्माराम गावकर व इतर मान्यवर हजर राहणार असून क्रिकेटचा आस्वाद खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक प्रशांत देसाई व इतर सहकाऱ्यांनी केले आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा ही स्पर्धा वेगळी ठरणार अाहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. स्पर्धा एकूण पाच रविवारी घेण्यात येणार असून यासाठी आतापर्यंत पंचायत स्तरावर १६, नगरपालिका स्तरावर १६ क्रिकेट संघांनी आपली नावनोंदणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशांत देसाई यांनी पुढे सांगितले की, गेली दोन वर्षे पावसाळी क्रिकेट संकल्पनेच्या माध्यमातून मुंबई, गोवा, विदर्भ अशा भागातील खेळाडूंनी सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे सहकार्य केले होते. स्पर्धेचे उद्घाटन दि. १५ जुलै रोजी झाल्यानंतर २५ जुलै, २९ जुलै, ५ ऑगस्ट, १२ ऑगस्ट रोजी सामने होणार आहेत. १५ जुलै व ५ ऑगस्ट दरम्यान सत्तरी तालुका पातळीवर पंचायत, नगरपालिका दरम्यानच्या संघांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. २२ व २९ जुलै दरम्यान राज्यातील इतर पंचायती व नगरपालिका स्तरावरील स्पर्धा होणार आहे.
देसाई पुढे म्हणाले, आतापर्यंत या स्पर्धेसाठी कोणाकडूनही आर्थिक मदत घेतलेली नसून यासाठी शरयू टोयोटा व राजकीय राज कँबल्स यांचे पूर्ण पाठबळ मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यांमध्ये अशा प्रकारची पावसाळी स्पर्धा आयोजित करून होंडा भागातील युवकांनी एक वेगळा संदेश गोव्यातील इतर भागांना दिला आहे. स्पर्धेसाठी प्रथम ५१,००० रुपये, दुसरे २५,००० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
पत्रकार परिषदेला राजेश राणे, गौतम पावसे, सुदत्त तेंडुलकर, विराज कोरगावकर आदी उपस्थित होते.