पावसाळ्यातील विकार व उपचार

Story: डाॅ. विरजा स्व. वेर्लेकर (साळकर) |
14th July 2018, 11:15 am
पावसाळ्यातील विकार व उपचार

पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांमध्ये मलेरिया, डायरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, टायफॉईड, व्हायरल इन्फेक्शन, अशक्तपणा, अतिसार, कावीळ आणि पोटदुखी अर्थात पोटविकारांचा त्यात समावेश होतो.
पोटदुखी ही पावसाळ्यात गंभीर रुप धारण करू शकते. यामध्ये प्रामुख्याने उलटी, धाप लागणे, डायरिया आणि पोटात वेदना होणे या लक्षणांचा समावेश होतो. यातही आरोग्य चांगले राहण्यासाठी उकळलेले पाणी पिणे आणि बाहेरचे खाद्यपदार्थ टाळणे हाच योग्य प्रतिबंध ठरतो, पावसाळ्यात होणाऱ्या या साथींपासून प्रतिबंधात्मक उपाय, हाच योग्य पर्याय.     
बदलते वातावरण आणि पहिला पाऊस आपल्यासाठी, आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकतो. म्हणूनच या काळात वातावरणात येणाऱ्या गारव्यामुळे फ्लूचा (ताप) धोका अधिक वाढतो. अगदी चांगल्या सुदृढ व्यक्तीलाही हा फ्लू अंथरुणाला खिळवून ठेवू शकतो, म्हणूनच यापासून दूर राहण्यासाठी काही साधे सोपे प्रतिबंधात्मक उपाय लक्षात ठेवण्याची गरज आहे.     
प्रतिबंधात्मक उपाय
पावसाळ्यात आपले हात स्वच्छ धुवा, अगदी जेवणापूर्वीही हात धुणे आवश्यक आहे. आपले तोंड शक्यतो कापडाने झाका. एखाद्या आजारी व्यक्तीला पाहायला गेल्यानंतर शक्यतो तोंडावर रुमालाचा वापर करावा. त्यामुळे फ्लूला आपोआप प्रतिबंध होईल.     
या दिवसांत थंड पदार्थ खाऊ नका. आईस्क्रिम, कोल्ड ड्रिंक्स अथवा अन्य कोणतेही पदार्थ शक्यतो टाळावेत. कारण या काळात ‘व्हायरल इन्फेक्शन’ हे प्रचंड वेगाने पसरत असल्याने फ्लूचा धोका अधिक असतो.     
पावसाळ्यात शक्यतो संतुलित आहार घ्यायला हवा. यामध्ये हिरव्या पालेभाज्या, प्रथिनयुक्त आहार, भाजीफळे आदींचा समावेश असावा. नेहमी गरमगरम, ताजे अन्न घेतल्याने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे अशक्तपणा आणि अन्य साथींपासून शरीराचे संरक्षण केले जाते. या काळात जास्तीत जास्त पाणी पिणे, हा सर्वात चांगला उपाय आहे.     
अगदी फ्लूपासूनही त्यामुळे आरोग्य जपणे शक्य आहे. जी व्यक्ती तीन ग्लास पाणी पिते, तिला अन्य दिवसात आठ ग्लास पाणी पिणाऱ्यांच्या तुलनेत घसादुखी, नाक गच्च होण्यासारखा त्रास अत्यंत कमी होतो. गरम चहा हाही यावर एक उपाय आहे. पण त्यातही चहात आले आणि लवंग वापरून तो घेतल्यास शरीराला फायदेशीर ठरतो.     
याशिवाय वाढत्या ताणामुळेही शरीरावर परिणाम होत असतात. त्यात फ्ल्यू तर अधिक त्रासदायक ठरतो. त्यामुळे फ्लू झाल्यास मनावरचा ताण कमी होण्यासाठी प्रयत्नशील रहा, त्यामुळे यातून तुम्ही लवकरात लवकर बरे होऊ शकाल.     
फ्लूवरील दहा उपाय     
फ्लू प्रत्येकाला त्रासदायक ठरू शकतो. अगदी सुदृढ व्यक्तींनाही तो अडचणीत आणू शकतो. फ्लूग्रस्त व्यक्ती कमालीच्या अशक्तपणामुळे नीट झोपूही शकत नाही. म्हणूनच अशा रुग्णांना घरीच बनवलेला कमी तेलकट, कमी मसालेदार असलेला आहार दिला पाहिजे. संतुलित आहारामुळे शरीरातील उर्जा वाढून त्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. चांगला आहार हाच फ्लूला रोखण्यासाठी चांगला उपचार आहे.     
फळांमध्ये प्रथिन (प्रोटिन्स) आणि जीवनसत्त्व (व्हिटॅमिन्स) भरपूर आणि नैसर्गिक रुपात असतात. संत्री, मोसंबी, सफरचंदाचा वापर फ्लू झालेल्या काळात अधिक केल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखले जाते. डिहायड्रेशन अर्थात अंगातील पाणी कमी होणे यापासूनही संरक्षण होते.     
अगदी एक प्लेट सॅलडद्वारे कार्बोहायड्रेट मिळतात. याशिवाय काकडी, गाजर, बीट याबरोबरच फळांचे ज्युसही फायदेशीर ठरतात. गाजर, टोमॅटो आदींचा ज्यूस घेतल्यास अशक्तपणा दूर होण्यास अधिक मदत होते.     
ब्राऊन ब्रेडमध्ये प्रोटिन्स जास्त असतात. जे शरीरात अधिक ऊर्जा निर्माण करतात, त्यामुळेच ब्राऊन ब्रेड आणि फळांचा पालेभाज्यांचा आहारात अधिक समावेश असावा. अगदी आले वापरलेला चहा हा चांगला घरगुती उपचार आहे. या चहामुळे घशात होणारी खवखव, आग, जळजळ कमी होते.     
याशिवाय अॅकोनाइट, एलियम सॅपा, सबाडिल्सा, कालीबायक्रोमिक्स इत्यादी अशा अनेक होमिओपॅथी औषधाने फ्ल्यूवर मात करता येते. पण होमिओपॅथी तज्ज्ञाच्या सल्ल्याने औषधांचे सेवन करणे योग्य आणि फलदायी ठरते. होमिओपॅथीक औषधांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (उत्तरार्ध)

(लेखिका विविध विषयांवर लिहितात.)