बटाटा नव्हे, एक लस

Story: डाॅ. विक्रांत जाधव |
14th July 2018, 11:15 am
बटाटा नव्हे, एक लस

भारतीयांना प्रिय असलेला, घराघरात आवडणारा ‘बटाटा केवळ पोषक, चविष्ट, चरबी वाढवणारा एवढेच नसून जुलाबावरील एक उत्तम लस आहे, असे मेरीलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सिद्ध केले.
 व्याधींपासून अलिप्त ठेवण्यासाठी त्या त्या व्याधींची लस शरीरात टोचून त्या व्याधींविरुद्ध झगडणारी यंत्रणा आधीच तयार करून ठेवणे अतिशय सोपे व उत्तम होते. म्हणूनच संपूर्ण विश्वात लसीचे संशोधन जोमाने सुरू आहे. जनावरांपासून, रसायनांपासून लस संशोधित करताना अमेरिका व युरोप या देशांनी वनस्पती व खाद्यपदार्थांमध्ये जंतूविरोधी घटक शोधण्याचे काम सातत्याने चालू ठेवले आहे. या संशोधनात प्रामुख्याने भारतीय आहार पद्धतीमध्ये अधिकतम प्रचलित असलेल्या वनस्पती, भाज्या, फळे यांना प्राधान्य दिले आहे व त्यावरून लस निर्माण करण्यात त्यांना यशही प्राप्त होत आहे. लस निर्माण करताना तोंडावाटे लस दिल्यास अधिक सोयीचे होते असे शास्त्रज्ञांचे मत आहे. मुख्यत: विकसनशील देशांमध्ये लस टोचण्यापेक्षा लस तोंडावाटे दिल्यास जास्त प्रमाणात लसीकरण होऊ शकते असे निष्कर्षावरून लक्षात आले आहे.  ‘बटाटा’ गरीबांपासून श्रीमंतांपर्यंतचा अत्यंत प्रिय पदार्थ होय. मध्यंतीच्या काळात बटाट्यामधील स्निग्धांशामुळे तसेच स्थूलता वाढवण्याच्या गुणधर्मामुळे शास्त्रज्ञ बऱ्याच वेळा लोकांना त्यापासून वंचित करत होते. तेच शास्त्रज्ञ आता कॉलरा व जंतूसंसर्गामुळे होणाऱ्या जुलाबांसाठी बटाट्याचे सेवन औषधयुक्त असल्याचे सांगावयास लागले आहेत. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात कच्च्या बटाट्याच्या सेवनाने e-coli या जंतूविरुद्ध लढण्याची प्रतिकारक्षमता निर्माण होते, असे आढळून आले आहे.
पुढे या संशोधनाचे प्रयोग बटाट्यापासून लस तयार करून उंदरांवर करण्यात आले. ज्या उंदरांना ही बटाट्याची लस देण्यात आली त्यांच्यामध्ये e-coli विरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण झाल्याचे आढळून आले. शास्त्रज्ञांना तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या इतर लसींचा उपयोग मनुष्याच्या पोटातील पाचक स्त्रावांच्या कार्यामुळे नष्ट होताना दिसत असे. परंतु कॅलिफोर्नियामधील लोमालिंडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यावर मात केली असून तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या पोटाच्या विविध आजारांवरील लसी तयार करण्यात यश मिळवले आहे.(पूर्वार्ध) 
(लेखक आयुर्वेदिक वैद्य आहेत.)