मेंदूच्या पेशींची निर्मिती

मंत्र आरोग्याचा

Story: डाॅ. भिकाजी घाणेकर |
14th July 2018, 09:37 am
मेंदूच्या पेशींची निर्मिती


मेंदूमध्ये अनेक पेशी असतात. त्याला इंग्रजीत सेल्स म्हणतात. आता दुसऱ्या पेशींपासून मेंदूच्या पेशी तयार करता येणार आहेत. जर्मनीतील एका विद्यापीठात याविषयी संशोधन सुरू आहे. या पेशी तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले तर पार्किन्सन, अल्झायमर या मेंदूच्या आजारांवर रामबाण उपाय सापडेल.
केवळ हेच आजार नव्हेत, तर फेफरे (मल्लूक) येणे या आजारावरही औषध तयार करण्यात याचा उपयोग होणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या पेशींचा वापर त्यासाठी केला जाणार आहे. सध्या हे संशोधन प्राथमिक स्तरावर आहे.
मेंदूचे तीन भाग असतात. एक भाग दिवसाचे काम करतो. दुसरा रात्रीचे काम करतो, तर तिसरा काहीही काम न करता गप्प असतो. जेव्हा न्यूरोसर्जन मेंदूवर शस्त्रक्रिया करतात, तेव्हा याच भागातून वाट काढत हवी तसली शस्त्रक्रिया करतात. या तीन भागांमुळे मेंदूवर ताण पडत नाही.
पार्किन्सन व अल्झायमर हे दोन आजार अतिशय कटकटीचे व त्रासदायक आहेत. ते सहसा ठीक होत नाहीत. तसेच अनुवांशिकतेने ती होऊ शकतात. म्हणजे आजोबांना असले तर नातवाला होऊ शकते. या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे. स्टेम सेलमुळे या नव्या पेशी करणे सहजसाध्य झाले आहे, असे संशोधकांनी सांगितले. सध्या यावर बारकाईने संशोधन चालले आहे. त्याचे अनेक फायदे होतील, असेही त्यांनी सांगितले.
केवळ जर्मनीतील एकाच विद्यापीठात नव्हे, तर इतरही अनेक विद्यापीठात हे संशोधन चालले आहे. आम्ही एक दिवस रक्तही तयार करू असा दावा एका संशोधकाने केला आहे.