इंग्लंडविरुद्ध भारत पहिला एकदिवसीय आज

11th July 2018, 07:19 Hrs

नॉटिंघम : इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास बळावलेली टीम इंडिया गुरुवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेत लय कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. ही एकदिवसीय मालिका आगामी वर्षांत होणाऱ्या विश्व चषक स्पर्धेची ‘रिहर्सल’ मानली जात आहे. आगामी विश्व चषक स्पर्धा २०१९ सालात इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या एकदिवसीय मालिकेमुळे तेथील परिस्थिती जाणून घेण्याची सुवर्णसंधीच मिळणार आहे.
टीम इंडियाने जरी इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका आपल्या नावावर केलेली असली तरी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाने यापूर्वीच्या द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारली असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मागील अनेक एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केलेले आहे. इंग्लंडचा जोस बटलर, जॉसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जानी बेयरस्टा आणि इयान मॉर्गन हे खेळाडू पूर्ण भरात आहेत आणि बेन स्टोक्समुळे त्यांचा संघ अतिशय मजबूत वाटत आहे. २०१५च्या विश्व चषक स्पर्धेत निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंडने ६९ पैकी ४६ सामन्यात यश मिळवले आहे. टीम इंडियाने जानेवारी २०१७मध्ये दोन देशांच्या मालिकेत इंग्लंडला पराभूत केले होते.
गुरुवारपासून येथे सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला विश्व चषक स्पर्धा नजरेसमोर ठेवून विविध प्रयोग करणे शक्य होणार आहे. सध्या भारताचा के. एल. राहुल पूर्ण भरात खेळत असल्यामुळे कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजू करू शकतो. राहुलने आयर्लंडविरुद्ध ७० धावा आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात नाबाद १०१ धावा फटकावल्या आहेत. शिखर धवन आणि रोहित शर्मा भारताच्या डावाची सुरुवात करतील तर राहुल तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. या फलंदाजी क्रमामुळे कर्णधार कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागणार आहे. त्यानंतर सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी आणि धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्या मैदानात उतरतील.
गोलंदाजीत कुलदीप यादवने टी-२० मालिकेत शानदार प्रदर्शन केले आहे, त्यामुळे त्याला संघात स्थान मिळू शकते. त्यानंतर जलदगती गोलंदाज म्हणून सिद्धार्थ कौल किंवा शार्दुल ठाकूरला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भुवनेश्वर कुमार यादवची कंबरेजी दुखापत बरी झालेली असल्यामुळे तो उमेश यादवच्या सोबत नवीन चेंडू हाताळणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजय मिळवल्यामुळे इंग्लंड संघाचे मनोधर्य उंचावलेले आहे. त्याशिवाय आयपीएलमध्ये चमकलेल्या बटलरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.संभाव्य संघ :
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल. राहुल, महेंद्र सिंह धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड : इयान मॉर्गन (कर्णधार), जॉसन राय, जानी बेयरस्टा, जोस बटलर, मोईन अली, जो रूट, जॅक बाल, टॉम कुरेन, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल रशीद, डेव्हिड विली, मार्क वूड.