फ्रान्सच्या विजयानंतर पॅरिसमध्ये जल्लोषाचा महापूर


11th July 2018, 07:17 pm
फ्रान्सच्या विजयानंतर पॅरिसमध्ये जल्लोषाचा महापूर

पॅरिस :बेल्जियमला नमवल्यानंतर फ्रान्सने फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करताच संपूर्ण पॅरिस शहर आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरला व ‘विवे ला फ्रान्स’च्या गोंगाटात संपूर्ण शहर दणाणून सोडले. मंगळवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात फ्रान्सने बेल्जियमला १-०ने नमवले होते.
पॅरिसचा प्रसिद्ध स्मारक आर्क डे ट्रायोम्पेजवळ रात्री लोकांचा महापूरच जणू आला होता जाे २००६ नंतर पहिल्यांदाच संघ अंतिम फेरीत पोहोचण्याचा आनंद साजरा करण्यासाठी आला होता. घरात टीव्ही समोर बसलेले क्रीडा चाहते बाल्कनीत आले व सामूहिक आनंदोत्सव सुरू झाला.
काही क्रीडा चाहते रस्त्यांवरील दिव्यांवर चढले होते तर काहींच्या हातात राष्ट्रध्वज होते व ते रस्त्यावर मस्त होऊन नाचत होते. हॉटेल व रेस्टोरेंटमध्ये क्रीडा चाहत्यांच्या जल्लोषाला पारावार राहिला नव्हता व अनेक चाहत्यांच्या चेहऱ्यावर राष्ट्रध्वज रंगवलेला होता. काही चाहत्यांनी रंगात भंग आणला मात्र पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. पॅरिसच्या ऐतिहासिक टाऊन हॉलजवळ मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी जवळपास २० हजार फुटबॉलप्रेमींची उपस्थिती होती.
फुटबॉल चाहत्यांना विजयामुळे आनंद सहन करणे शक्य होत नव्हते व ते आनंदाच्या भरात झाड, गाड्या, कचरापेटीपासून रस्त्यांवरील वाहनांच्या छतावर चढले होते.
२०१५ सालचा दहशतवादी हल्ला
फ्रान्समध्ये २०१५ साली दहशतवादी हल्ला झाला होता व त्यानंतर सर्वत्र कडेकोट सुरक्षाव्यस्था ठेवण्यात आली होती व टाऊन हॉलवर जवळपास १२०० पोलिस उपस्थित होते. २० वर्षांपूर्वी विश्वचषक जिंकला तेव्हा फ्रान्समध्ये अशाप्रकारचाच आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता व त्यावेळी प्रकाशाचे शहर पॅरिस ध्वजाच्या तीन रंगात लाल, निळा व पांढऱ्या रंगाने रंगले होते.