अर्थसंकल्पीय चर्चेवेळी आमदारांची कसोटी

विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका महत्त्वाची; भाषण उपलब्ध नसल्यामुळे अभ्यासावर भर


12th July 2018, 06:41 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता          

पणजी : यंदा विधानसभेत मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून अर्थसंकल्पीय भाषण सादर करण्यात आले नाही. या लिखीत भाषणाअभावी अर्थसंकल्पीय चर्चेवेळी बोलण्यासाठी आमदारांना अर्थसंकल्पाशी संबंधित पुस्तिका आणि इतर दस्तएेवजांचा अभ्यास करणे भाग पडले आहे. एकूणच यंदाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पीय चर्चेवेळी आमदारांची कसोटी लागणार आहे.       

मागील फेब्रुवारी महिन्यात १९ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१८ पर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशन काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती बिघडल्यामुळे हे अधिवेशन ४ दिवसांत आटोपते घेण्यात आले. तरीही अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हजर राहिले. त्यांनी अर्थसंकल्पीय भाषण सादर केले नाही; परंतु राज्याचे लेखी अंदाजपत्रक मांडले. आता या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून आमदारांना अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घ्यावा लागणार आहे. एरवी अर्थसंकल्पीय भाषणामुळे चर्चेत भाग घेणे सोपे बनत होते. मागील अर्थसंकल्पीय भाषणातील घोषणा आणि नव्या अर्थसंकल्पीय भाषणातील घोषणा आदींचा संदर्भ घेऊन विधानसभेत आमदारांकडून विषय मांडला जात होता.        

विरोधी काँग्रेसकडून सरकारला धारेवर धरण्यासाठी जोरदार व्यूहरचना आखण्यात आली असली तरी अर्थसंकल्पीय चर्चेवेळी मुख्य भाषणासाठी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर हे नेमके कोणता पवित्रा घेतात, याचे अनेकांना कुतुहल लागून राहिले (पान ४ वर)

 आहे. माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांच्याकडूनच अर्थसंकल्पीय चर्चेवेळी पुढाकार घेतला जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय भाषण उपलब्ध नसल्याने प्रत्येक खात्यासाठी किती जादा आर्थिक तरतूद केली आहे किंवा किती खात्यांची तरतूद कमी केली आहे, हे जाणून घेण्यासाठी अंदाजपत्रकीय दस्तएेवजांचा अभ्यास करावा लागणार आहे. विविध नवीन घोषणा किंवा योजनांची माहिती अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे उपलब्ध होऊ शकलेली नाही आणि वेगळ्या जाहीर झालेल्या योजना आणि घोषणांची माहिती मिळवून विविध खात्यांचा आढावा घ्यावा लागणार आहे.       

राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते ३ आॅगस्ट २०१८ पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात पहिले दोन दिवस अर्थसंकल्पावरील चर्चा आणि पुढील दहा दिवस खातेनिहाय अनुदानित मागण्यांवर चर्चा होणार आहे.       

सरकारच्या कोंडीसाठी काँग्रेसची व्यूहरचना

विरोधी पक्ष काँग्रेसकडून सरकारला अडचणीत आणण्यासाठी जोरदार व्यूहरचना आखण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय चर्चेवेळी मुख्य भाषणासाठी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर हे नेमके कोणता पवित्रा घेतात, याचे अनेकांना कुतुहल लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांच्याकडून अर्थसंकल्पीय चर्चेवेळी पुढाकार घेतला जाण्याची शक्यता आहे.