गोवा राज्य उच्च शिक्षण मंडळ स्थापनेला मान्यता

मंडळाचा वार्षिक खर्च सुमारे ५ कोटींच्या घरात


12th July 2018, 06:40 pm

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी: राज्य सरकार, विद्यापीठ, कॉलेज व तज्ज्ञांमध्ये समन्वयासाठी राज्यस्तरीय गोवा राज्य उच्च शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. बुधवारी मंत्रिमंडळाने या मंडळाचा प्रस्ताव मंजूर केला.       

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील या मंडळाची स्थापना राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान २०१३ मधील तरतुदींनुसार केली आहे. राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्चा उंचावण्यासाठी नियोजन करणे, धोरण निश्चित करण्यासाठी समन्वय साधणे, शैक्षणिक व सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देणे, संस्थांची स्वायत्तता व जबाबदारीविषयी नियोजन करणे व समन्वय साधणे अशी कामे हे मंडळ करेल. सध्या या मंडळाचा वार्षिक खर्च निश्चित नसला तरी सुमारे ५ कोटी रुपये अंदाजे वार्षिक खर्च येणार असल्याचे मंत्रिमंडळासमोर आलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.       

राज्य सरकारला उच्च शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सल्ला देणे, शैक्षणिक स्तरावर राज्यातील शिक्षण संस्था व देशातील किंवा विदेशातील शिक्षण संस्थांमध्ये समन्वय साधणे, तज्ज्ञांना आमंत्रित करून शिक्षण क्षेत्रासाठी चर्चासत्र, कार्यशाळा, परिषदा घेणे, शिक्षण, औद्योगिक, कृषी व विज्ञान क्षेत्रातील लोकांशी संवाद साधणे अशा अनेक गोष्टी हे मंडळ करणार आहे. त्याशिवाय राज्य उच्च शिक्षण नियोजन व विकासासाठी विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थांकडून आलेल्या गोष्टींवर काम करणे अशा अनेक प्रस्तावांवर हे मंडळ काम करणार आहे.

नियुक्त सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षे

अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, सदस्य, अधिकारी व कर्मचारी असा या मंडळाचा ताफा असेल. मंडळावर नियुक्त सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असेल, तसेच एक तृतियांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतील. त्या रिकाम्या जागा पुन्हा भरल्या जातील. मंडळाचे २० सदस्य हे राज्यातील असावेत व पाच सदस्य हे राष्ट्रीय स्तरावरील असावेत. सर्वांना बैठकीच्या वेळी प्रवास खर्च, रोजचा खर्च व बैठकीचा भत्ता देण्यात येईल.