आयटी धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

पणजीत १४, १५ रोजी आयटी दिवस कार्यक्रम


12th July 2018, 06:38 pm

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी : राज्याचे नवे माहिती-तंत्रज्ञान (आयटी) धोरण बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. १४ व १५ जुलै असे दोन दिवस पणजीत आयोजित एका मोठ्या कार्यक्रमात केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते ते प्रसिद्ध केले जाईल.      

सरकारने मंजूर केलेल्या धोरणात आयटी पार्क विकसित करणे, गोव्यातील नवोदितांना तसेच गोव्यातील तंत्रशिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी देण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन अनुदान, गोव्यातील तंत्रशिक्षण संस्थांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी खास सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करणे, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, लघु व्यावसायिक युनिटना मार्केटिंग सपोर्ट, परफॉर्मन्स ग्रँट व कर्जावर व्याज अनुदान, गोव्यात नोंद असलेल्या किंवा गोव्यातील उद्योजकाचा मोठा वाटा असलेल्या कंपन्यांना खास प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद या धोरणात आहे. आयटी धोरण २०१८ मध्ये जमीन किंवा बिल्टअप क्षेत्रासाठी परतावा, भाडे अनुदान, कॅपिटल गुंतवणूक अनुदान, नोंदणी व स्टँप ड्युटी अनुदान, विजी, सोलकर, इंटरनेटमध्ये अनुदान, वेतन अनुदान, तसेच कॅम्पस भरती साहाय्य यांसारख्या योजनांचा समावेश आहे.       

पणजीत १४, १५ रोजी आयटी दिवस कार्यक्रम

माहिती-तंत्रज्ञान (आयटी) धोरण जाहीर करण्यासाठी व गोव्यातील आयटी क्षेत्रातील लोकांना फायद्याचे ठरावे, तसेच या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी १४ व १५ जुलै असे दोन दिवस पणजीत आयनॉक्स चित्रपटगृहात आयटी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एक हजारांहून अधिक लोक या कार्यक्रमात सहभागी होतील, असे माहिती-तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. या कार्यक्रमात गुगल व फेसबुकद्वारे कौशल्य विकास कार्यशाळा घेतली जाईल. आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.