सुर्लातील बार मालकांची उद्या वाळपई पोलिस घेणार विशेष बैठक

12th July 2018, 03:12 Hrs

 पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर 

    यांची माहिती

 तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

प्रतिनिधी। गोवन वार्ता

वाळपई : सत्तरीतील सुर्ला गावात दारू दुकाने बंद करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीवरून खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या शनिवार व रविवारी कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी वाळपई पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी शुक्रवारी बार मालकांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. 

निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्लातील ग्रामस्थांनी गावातील दारू दुकाने बंद करण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर गावात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भातील निवेदनही ग्रामस्थांनी आमदार प्रतापसिंग राणे व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना सादर केल्यानंतर बारमालकांनीही आपली दुकाने बंद करण्यात येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे शनिवारी व रविवारी येथे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गावात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठीच वाळपई पोलिस स्थानकावर बार मालकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, बार मालकांच्या म्हणण्यानुसार, गावातील रस्ते अरुंद असून, ते रुंद करण्याची गरज आहे. याला बार मालक जबाबदार नसून, ती सरकारची जबाबदारी आहे. यासाठी बार मालकांवर आरोप करणे चुकीचे आहे. मात्र शनिवार व रविवारी गावात दारू पिण्यासाठी येणारे पर्यटक व त्यांच्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली असून, यासंदर्भातच बैठक होणार असल्याचे वायंगणकर यांनी स्पष्ट केले आहे.

सुर्लात शनिवार, रविवारी

पोलिसफाटा तैनात करणार 

निरीक्षक शिवराम वायंगणकर म्हणाले, आमदार प्रतापसिंग राणे यांनी पोलिस निरीक्षकांना शनिवार व रविवारी सुर्लामध्ये पोलिस संरक्षण देण्यास सांगितले होते. त्यानुसारच चोर्ला घाट परिसराबरोबरच सुर्लातही मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. यावेळी गोंधळ व वाहतूक नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. चोर्ला परिसरात गेल्या रविवारी कमी प्रमाणात पोलिस ठेवण्यात आले होते. पण या रविवारी यात हयगय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related news

‘फोमेंतो मीडिया’तर्फे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

मिरामार येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पाकला अद्दल घडविण्याची मागणी Read more

विष्णू वाघ यांच्यावर आज फोंड्यात अंत्यसंस्कार

बांदोडकर मैदानावर अंत्यदर्शन; मंत्री गोविंद गावडे यांची माहिती Read more