अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका देणारे गोवा भारतात पहिले : राज्यपाल


12th July 2018, 03:10 am
अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका  देणारे गोवा भारतात पहिले : राज्यपाल

 सहा रुग्णवाहिकांचे अनावरण

 ग्रामीण भागांत सेवा सुरू

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : इतर राज्यांच्या तुलनेत गोवा सरकार राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा पुरवत आहे. आरोग्य क्षेत्रात अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका ही उच्च दर्जाची सेवा देणारे गोवा हे पहिलेच राज्य ठरले आहे. रुग्णवाहिकांचा रुग्णांना मोठा लाभ होणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी बुधवारी केले.

राज्यातील आरोग्य सेवेत बुधवारपासून नवीन सहा अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका दाखल झाल्या. या रुग्णवाहिकांच्या अनावरणासाठी सचिवालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आरोग्य संचालक डॉ. संजीव दळवी, डॉ. राजनंदा देसाई आदी उपस्थित होते. दरम्यान, राज्यपाल सिन्हा यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे अनावरण करण्यात आले. या रुग्णवाहिका नेत्रावळी, बेतकी, जुने गोवे, चोडण, केपे, अस्नोडा या भागांत सेवा देणार आहेत.

रुग्णवाहिकांचा लाभ घ्या : आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, आधुनिक पद्धतीच्या आरोग्य सेवा देणाऱ्या व प्रगत तंत्रज्ञान असलेल्या सहा नवीन रुग्णवाहिका गोव्यातील नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांतील नागरिकांची गैरसोय दूर होणार असून, त्यांना तत्काळ सेवा मिळण्यास मदत होणार आहे. आपण आरोग्य क्षेत्रात नवनव्या गोष्टी आणत असून त्याचा गोमंतकीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.