मये सरपंचांचा राजीनामा


22nd June 2018, 03:55 am
मये सरपंचांचा राजीनामा


प्रतिनिधी। गोवन वार्ता

डिचोली :

मये पंचायतीचे सरपंच विश्वास चोडणकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा बुधवारी पंचायत संचालकांना सादर केला आहे. राजीनामा हा ठरल्या करारानुसार दिलेला आहे. आता सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, भाजपा सदस्यालाच सरपंच करण्याची रणनीती आखली जात असून त्यामुळे काही जण भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

विनिता गावकर किंवा विजय पोळे यांच्यापैकी एकाची सरपंचपदी वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. मात्र, अद्याप याबाबत कसलाच निर्णय झालेला नाही असे एका पंचाने सांगितले. दरम्यान, चोडण पंचायतीचे सरपंच पंढरी वेर्णेकर तसेच कारापूर सर्वण पंचायतीचे सरपंच रमेश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता सरपंचपदासाठी चाचपणी सुरू आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीने पक्ष संघटन मजबूत करण्यात भर दिला आहे. पंचायत सदस्यांचा भाजपा प्रवेश गेले काही दिवस सुरू आहे. अजूनही काही पंच भाजपात प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर यांनी सांगितले. प्रवीण झांटये यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्यांचे आम्ही स्वागत करीत असून पक्ष मजबूत करून सर्व पंचायत विभागातील संघटना भक्कम करण्यावर पक्षाने भर दिला असल्याचे सांगितले. ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत, असे झांटये यांनी सांगितले. भाजपाचे सरचिटणीस सदानंद तानवडे यांनी मुख्यमंत्री परतल्यानंतर भाजपात उत्साहाचे वातावरण असून अनेकांनी भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली असून संघटन मजबुतीवर भर दिला आहे. आगामी काळाला अनेक कार्यकर्ते व नेते पक्षात प्रवेश करतील, असेही त्यांनी सांगितले.