फोमेंतो कंपनीकडून उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू

शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याचे आवाहन


22nd June 2018, 03:37 am



प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : गोव्याच्या बुद्धिमान व हुशार विद्यार्थ्यांना अमेरिकेत अभियांत्रिकी व दर्जात्मक उच्च शिक्षण घेण्यासाठी फोमेंतो कंपनीने शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीचा हुशार विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फोमेंतो स्कॉलर्स प्रोग्रामाचे निमंत्रक उदय बाळ्ळीकर यांनी केले आहे.

फोमेंतो कंपनीने २०१४ साली ही शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू केली आहे. अमेरिकेतील एसडीएसएमटी महाविद्यालयात अभियांत्रिकी व दर्जात्मक उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला जात आहे. सुरुवातीला १९ विद्यार्थ्यांनी एसडीएसएमटी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. यावर्षी आणखी ५ विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. अमेरिकेत अभियांत्रिकी दर्जात्मक शिक्षणात एसडीएसएमटी महाविद्यालय अग्रस्थानी आहे. विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी ज्ञानात भर घालण्याबरोबर त्यांचा चौफेर विकास करण्यातही त्या महाविद्यालयाचा अग्रक्रम लागतो. फोमेंतो कंपनीने शिष्यवृत्ती दिलेल्या गोव्याच्या एका विद्यार्थ्याने सोनेरी यश मिळविलेले आहे. या शिष्यवृत्तीला पात्र ठरण्यासाठी फोमेंतो कंपनी शैक्षणिक कारकिर्द दर्जात्मक तसेच बुद्धीमान व हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे.

२०१८-१९ शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेत अकरावीच्या वर्गात असलेले विद्यार्थी कंपनीच्या शिष्यवृत्तीला पात्र ठरणार आहेत. त्या विद्यार्थ्यांनी कंपनीच्या www.fomentoscholars.org या संकेत स्थळावर संपर्क साधावा. प्रवेश अर्ज ऑनलाईन उपलब्ध आहे. गोव्यातील अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी कंपनीच्या या शिष्यवृत्तीला लाभ घ्यावा, असे आवाहन फोमेंतो कंपनीतर्फे करण्यात आले आहे.