धोकादायक खड्ड्यांबाबत पणजी पोलिसांत तक्रार

जुने गोवे प्रकरणामुळे नागरिकांत जागृती


22nd June 2018, 01:22 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी : जुने गोवे पोलिसांनी रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांबाबत गुन्हा दाखल करण्याच्या घटनेचे राज्यभरातील नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे. सोशल मीडियावरून हे वृत्त व्हायरल झाल्यामुळे आता ठिकठिकाणी अशा तक्रारींचा आेढा सुरू झाला आहे. पणजी पोलिसांत गुरुवारी पहिली तक्रार दाखल झाली आहे.       

रस्ता सुरक्षेबाबत राज्यात मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे. वाहतूक पोलिस आणि आरटीआेकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरू आहे. रस्त्यांवरील धोकादायक खड्ड्यांमुळे संभवत असलेल्या धोक्याबाबत मात्र सार्वजनिक बांधकाम खाते आणि संबंधित पालिकांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे. खड्ड्यांमुळे होणारे अपघात सरकार दरबारी नोंद होत नाहीत. खड्ड्यांत पडून अनेकजण जखमी होण्याचे प्रकार सुरू असतात. या धोकादायक खड्ड्यांमुळे अनेकांवर जखमी होऊन घरी बसण्याची वेळ आेढवली आहे. याविरोधात आता मोठ्या प्रमाणात जागृती झाल्याने रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचे सत्र आता सुरू झाले आहे.       

गोवा रस्ता सुरक्षा फोरमचे आवाहन

पणजी पोलिसांनी अद्याप या तक्रारीवर गुन्हा दाखल केला नसला तरी या तक्रारीचा राज्यभरात बोलबाला झाल्याने ठिकठिकाणी नागरिकांनी अशाच पद्धतीच्या तक्रारी दाखल करण्याचे आवाहन ‘गोवा रस्ता सुरक्षा फोरम’ने केले आहे. या तक्रारींमुळे आता पोलिस खात्यावर दबाव वाढला आहे. धोकादायक खड्ड्यांमुळे मानवी जीवाला धोका निर्माण होत असल्याने यासंबंधी भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी वाढू लागली आहे.